आदिवासी भागात शिक्षण प्रसाराचा रंजनाताईंचा दृढ निश्चय, KURKHEDA_GADCHIROLI
आदिवासी भागात शिक्षण प्रसाराचा रंजनाताईंचा दृढ निश्चय;
महिन्यात सुरू केली ११ समाज विद्या केंद्रे
सर्व शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण चालू राहण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या संकल्पनेतील सर्वात जास्त म्हणजे एका महिन्यात तब्बल ११ समाज विद्या केंद्रे सुरु करण्याचे खडतर कार्य दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तालुका समन्वयक रंजना लेंजे यांनी केले आहे.
समाज विद्या केंद्र गावाने नाकारले, कुरखेडाने स्वीकारले
गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास १५० किमी अंतरावर असलेला कुरखेडा तालुका अतिशय दुर्गम असा परिसर आहे. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अतिशय अप्रगत असलेल्या तालुक्यात शिक्षणाच्या संधी तशा जेमतेमच. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद झाल्या आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रवाह खंडित झाला. मुलांच्या शिक्षणासाठी सतत धडपड करणाऱ्या रंजना लेंजे यांनी तब्बल ११ समाज विद्या केंद्रांची उभारणी केली.
या संदर्भात रंजना लेंजे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘’इथपर्यंतचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. पुण्यामधील शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची समाज विद्या केंद्राची संकल्पना खूपच भावली. सरपंच, ग्रामस्थ, पालक, मुले यांच्याशी चर्चा करून त्यांच्या लेखी संमतीशिवाय ही केंद्रे सुरु करणे शक्य नव्हते. म्हणून प्रथम माझ्या नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) या गावात समाज विद्या केंद्राची सुरुवात करण्याचा विचार सरपंचांपुढे मांडला.
या अभियानाची संकल्पना समजून घेतल्यावर सरपंच म्हणाले, “उपक्रम खूप छान आहे, परंतु आपल्या गावात कोविड रुग्णांची संख्या खूप असल्याने समाज विद्या केंद्र सुरू करता येणार नाही. जर मुलांना काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार?” हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. भावनाविवश होऊन त्या म्हणाल्या, “त्यांच्या या भूमिकेने मी पूर्णपणे निराश झाले. मनातील कल्पना मनातच मारून टाकाव्या लागणार की काय असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण झाला. कारण शाळेतील मुलांना शिक्षण देत त्यांच्यासोबत आनंदाने घालविण्याच्या क्षणांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कार्यक्रमाचं प्रात्यक्षिक करून पाहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.”
चंद्रपूर सोडून गडचिरोली जिल्ह्यात जाण्याचा निर्धार
स्वत:च्या गावी समाज विद्या केंद्र सुरु करण्यास अपयश आल्यानंतर मूल्यवर्धन तालुका समन्वयक म्हणून काम करत असलेल्या ब्लॉकमधील मुलांची त्यांना आठवण आली. त्या म्हणाल्या, “तेथे प्रयत्न केल्यास नक्कीच केंद्र सुरु करता येतील असा विश्वास वाटला. किंचितही वेळ न दवडता मी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव या गावी सरपंच, पालक, ग्रामस्थ यांच्या भेटी घेऊन त्याच्याशी चर्चा केली. गावातीलच शिक्षण सारथी निवडून त्यांच्या मदतीने आपल्याला आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवता येईल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी होकार देऊन मला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.” वेळ न दवडता त्या चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात स्थायिक झाल्या आणि देऊळगाव या गावात पहिले समाज विद्या केंद्र १ ऑक्टोबर २०२० रोजी सर्व नियम पाळून सुरु झाले. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
एवढ्यावर थांबणे मंजूर नाही, आदिवासी भागात कामाचा ध्यास
पहिले समाज विद्या केंद्र चालू झाल्यावर इतर गावांतील सरपंच, ग्रामस्थ, पालक, मुले यांच्याशी चर्चा करून त्यांची लेखी संमती मिळविली. शिक्षण सेवकांना तयार करणे, केंद्रासाठी सुरक्षित, शिकण्यास योग्य अशी जागा मिळविणे, सर्वांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे अशी अनेक आव्हाने होती. शिवाय कुरखेडा हा आदिवासी तालुका. येथे प्रचलित शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. तिथे ऑनलाइन शिक्षणाचा तसा वापर करणे तसे दुरापास्त होते. आदिवासी समाजाची शिक्षणाप्रती असलेली उदासिनता, गावकर्यांची-पालकांची मानसिकता, सरपंच-ग्रामपंचयतीची परवानगी, जागेचा अडथळा असे असंख्ये प्रश्न, अडचणी आणि अडचणींवर मात करत या आदिवासी भागात समाज विद्या केंद्र होण्यास सुरुवात झाली.
एका महिन्याच्या आत खरकाडा गावात २, नवेझरीमध्ये २, अरततोंडीमध्ये २, देऊळगावमध्ये ३, गांगुलीमध्ये २ अशी एकूण ११ समाज विद्या केंद्रे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात सुरु केली. या अकरा समाज विद्या केंद्रात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे एकूण २६६ विद्यार्थी आनंदाने शिकत आहेत.
केंद्रांतील मुलांना येथील कामकाजाबद्दल काय वाटते असे विचारले असता त्या म्हणाल्या, “तालुका समन्वयक म्हणून मी जेव्हा या सर्व केंद्रांना भेटी देते तेव्हा सर्वच मुले खूप आनंदी दिसतात. अगदी शाळेला आल्याप्रमाणे सर्व तयारीनिशी येतात. गाणी, गोष्टी, खेळ, भाषिक उपक्रम अगदी आनंदाने, मनापासून करतात. शाळा बंद हा विचार पालकांच्याही मनातून निघून गेलेला आहे. त्यांना केंद्रात काय चालू आहे हे मुलांच्या गप्पा-गोष्टींमधून समजत असते. काही पालक केंद्राला भेट देऊन सर्व समजावून घेतात.”
सर्व समाज विद्या केंद्र दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत दीड तास शाळेप्रमाणे भरतात. मुले हसत-खेळत उपक्रम करत आहेत. शिक्षण सारथीही त्यांच्याबरोबर मनसोक्त आनंद लुटत आहेत. केंद्रांतील शिक्षण सारथींना ते करत असलेल्या कामाबद्दल काय वाटते हे जाणून घेतले तेव्हा राणी देवानंद दरवडे म्हणाल्या, “रंजनाताईमुळे आम्हाला आनंदाचा नवा मार्ग मिळाला आहे. आपल्याच भाऊ-बहिणींना शिकविण्याचा, त्यांच्याबरोबर वेळ घालविण्याचा अनुभव आतापर्यंत कधी मिळाला नव्हता. आम्हाला शिकायला व शिकवायला आवडतं. तेच काम मिळाल्यानं छान वाटतंय. मुले उपक्रमात आनंदाने सहभागी होतात. उपक्रम पुस्तिकेतील उपक्रम छानपैकी करतात.”
शिक्षण सारथींच्या कार्याबद्दल विचारले असता रंजनाताई म्हणाल्या, “सर्व शिक्षण सारथी नव्या उत्साहाचे आहेत. त्या त्या गावातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले किंवा घेत असलेले युवक-युवतींनी हे काम स्वत:हून स्वीकारलेले आहे. त्यांना आता गावात शिक्षकाप्रमाणे सन्मान मिळू लागला आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.”
कुरखेडातील आदिवासी शिक्षण सारथींचे प्रेरणादायी काम
कुरखेडा तालुक्यातील सर्व शिक्षण सारथी आदिवासी समाजातील आहेत. शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोण नक्कीच वाखाण्याजोगा आहे. कोणत्याही सोई-सुविधा नसललेल्या आणि नेहमीच अभावग्रस्त भागात वाढलेल्या या शिक्षण सारथींचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोण समाजापुढे नवा आदर्श निर्माण करणारा आहे. त्यांनी नि:स्वार्थपणे शिकवण्याचं केलेलं काम अतिशय महत्वपूर्ण आहे. आपल्याकडे जिद्द, इच्छा आणि मनातून उर्मी असेल तर कोणतंही काम सहजतेने होऊ शकतं. आणि काहीच अशक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
आपण केलेल्या प्रयत्नामुळे ११ समाज विद्या केंद्रे सुरु झाल्याने रंजनाताई खूपच आनंदी आहेत. मात्र तरीही त्याच आनंदात मश्गुल न राहता केंद्रांचे कामकाज अधिकाधिक चांगले कसे चालेल याकडे अधिकाधिक लक्ष देतात. प्रत्येक केंद्राला भेटी देऊन त्यांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण सारथींच्या चांगल्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात. हाती घेतलेले हे काम कधीच सोडू नये असे त्यांना वाटते. जोपर्यंत शाळा नियमितपणे सुरु होत नाहीत, तोपर्यंत हे काम आणखी उत्साहाने करणार असल्याचा निर्धार त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.