गौखेल ग्रामपंचायतीचा समाजासमोर नवा आदर्श; शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा ठराव, GAUKHEL_BEED
कोरोनामुळे आठ-नऊ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने एक आशेचा किरण दाखवला. तो अर्थातच ‘सहयोगी शिक्षण अभियान.’ मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत गावात ‘समाज विद्या केंद्र’ सुरू करावे. त्यासाठी लागणारी जागा व शिकवण्यासाठी शिक्षण सारथींची निवड करावी. हे सर्व सामाजिक कार्य असल्याने यासाठी शासन किंवा संस्थेकडून कोणताही निधी देण्यात येत नाही.
गौखेल येथील सहयोगी शिक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या समाज विद्या केंद्रातील मुलांना मास्कचे वाटप करताना तालुका समन्वयक मंगल शेकडे
सरपंचांच्या प्रस्तावानंतर आवश्यक सर्व बाबींची पडताळणी करून १ ऑक्टोबर २०२० पासून १६ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या अभियानाला सुरुवात झाली. सध्या राज्यातील २३ जिल्ह्यातील १०५ समाज विद्या केंद्रावर १९०४ विद्यार्थी रोज शिकायला येतात. मुलांना शिक्षण प्रक्रियेत गुंतवून ठेवणे, विस्कळीत झालेली शैक्षणिक परिस्थिती पूर्ववत करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
गावातीलच सुशिक्षित तरुण-तरुणींची ‘शिक्षण सारथी’ म्हणून निवड केली. मग गावागावात सुरू झाले ‘समाज विद्या केंद्र.’ येथे शाळेसारखेच पुन्हा वर्ग भरायला सुरुवात झाली. या आनंदाने मुलांच्या मनातील मळभ दूर होऊन चेहऱ्यावर निरागस हास्य फुलले. यापैकीच एक गाव म्हणजे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गौखेल. बीड एक दुष्काळी, शेती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेला तसेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. साधारण अशी परिस्थिती आणि १८५० लोकसंख्या असलेल्या गौखेल गावात या अभियानाला सुरुवात झाली.
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी, आनंददायी शिक्षण देण्यासाठी गावचे सरपंच कृष्णाजी शेकडे व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावात समाज विद्या केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अभियानासाठी खास मुंबईवरून गावाला आलेल्या तालुका समन्वयक मंगल शेकडे यांचं सहकार्य मिळालं. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शहाजी मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळेचे वर्गही उपलब्ध करून दिले. मग सर्वांच्या सहकार्याने गावात दोन केंद्र सुरू झाले.
या केंद्रांना सुरूवातीला मुलांचा प्रतिसाद कमी होता. पण हळूहळू पालकांचा व मुलांचा उत्साह आणि प्रतिसाद वाढत गेला. आणि गौखेल येथे तिसरे केंद्र डिसेंबर २०२० मध्ये सुरू झाले. तिन्ही केंद्रात पाचवीपर्यंत ३८ विद्यार्थी नियमित आणि उत्साहाने शिकायला येतात. यात मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे. या केंद्रांची वेळ सकाळी ९ ते ११ अशी आहे.
येथे शिक्षण सारथी म्हणून वृषाली शेकडे, करिश्मा शेकडे आणि ऋतुजा जगताप यांची सरपंचांनी निवड केली. तिघीही उच्च शिक्षण घेत आहेत. वृषाली व करिश्मा यांनी तर डीएड पूर्ण केलंय. त्या जबाबदारीने, सांभाळून घेऊन मुलांना मदत करतात. सुरुवातीपासून कोणतेही मानधन न घेता काम करणार्या या होतकरू तरुणींचा प्रामाणिकपणा, शिकवण्याची तळमळ पाहून त्यांना गौखेल ग्रामपंचायतीने मानधन देण्याचा निर्णय घेतला. सरपंच कृष्णाजी शेकडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामपंचायत निधीतून शिक्षण सारथींना महिना १००० रुपये या प्रमाणे एकूण ३००० रुपये निधी एकमताने मंजूर केला.
शिक्षण सारथींना महिन्याला १००० रुपये मानधन देण्याचा ठराव सरपंच कृष्णाजी शेकडे,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत मान्य झाला.
या विषयी गावचे प्रयोगशील, बी.कॉम झालेले उच्चशिक्षित आणि २०१७ पासून सरपंच असलेले कृष्णाजी शेकडे म्हणतात, ‘गाव आपलं आहे. आपलीच मुलं या केंद्रात शिक्षण घेत आहेत. मग आपल्या गावासाठी, मुलांसाठी काहीतरी करण्याची मानसिकता असेल, तर सर्व गोष्टी घडून येतात. सरपंचांच्या अधिकारात येणार्या ग्रामपंचायत निधीतून प्रत्येक शिक्षण सारथींना महिन्याला १००० रुपये मानधन देण्याचा ठराव आमच्या बैठकीत मान्य झाला.’
पुढे ते म्हणतात, ‘काही वर्षांपूर्वी आमच्या गावातील पालकांनी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवण्यास सुरुवात केली. मग गावातील जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत पालकांशी बोलून विश्वास दिला. त्यांना इथेच सर्व सोई-सुविधा दिल्या. एक शिक्षक कमी असताना ग्रामपंचायतीमार्फत मानधन देऊन शिक्षक नियुक्त केला. आता तालुक्यातील दर्जेदार शाळा असं आमच्या शाळेचं नाव झालंय.’
भारतीय जैन संघटना व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक आणि सहयोगी शिक्षण अभियानाचे प्रवर्तक शांतिलाल मुथ्था म्हणतात, ‘विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. कोरोनात हे भविष्य शिक्षणापासून वंचित होऊ नये. मग या मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासारखं दुसरं पुण्याचं काम नाही. म्हणून ही स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला. अशा प्रकारचे निर्णय प्रत्येक ग्रामपंचायतींनी घेतल्यास शिक्षण सारथींना मदत होईल. शिवाय मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल.’
गौखेलच्या तिन्ही केंद्राच्या शिक्षण सारथी वृषाली शेकडे, करिश्मा शेकडे, ऋतुजा जगताप त्यांच्या अनुभवाविषयी त्या मनमोकळेपणाने बोलतात. आम्हाला शिकायला व शिकवायला आवडतं. तेच काम मिळाल्यानं छान वाटतंय. सर्व नियम पाळून मुलं केंद्रात येतात. नवीन गोष्टी आत्मसात करतात. खेळ-गप्पा, गोष्टी अशा सर्व उपक्रमात मुलं विशेष उत्साहानं भाग घेतात. अभ्यास करतात. कधी कधी काही मुलं गोंधळ सुद्धा करतात, पण समजावून सांगितलं की, ते ऐकतात. उपक्रम पुस्तिकेतील उपक्रम दिलेल्या वेळापत्रकानुसार मुलांना शिकवतो. त्याच्यासोबत आम्हालाही शिकवण्याचा आनंद मिळतो. असा तिघींचाही एकंदरीत अनुभव होता.
समाज विद्या केंद्रासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणार्या शिक्षण सारथींना गावाने, सरपंचाने ग्रामपंचायत निधीतून केलेली मदत शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारी आहे.