परिपाठात दररोज सादर होतात प्रश्नोत्तरे, WARDHA_SELU_BORKHEDI
मूल्यवर्धनमध्ये प्रश्न विचारण्याच्या उपक्रमातून मुलांना अशाप्रकारे प्रेरित केले आहे की ते शाळेतील परिपाठामध्ये प्रश्नोत्तरे आयोजित करतात.
वर्धा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा बोरखेडी (कला) या शाळेत मूल्यवर्धन अंतर्गत स्व-जाणीवे संदर्भात उपक्रमांमधून प्रेरित होऊन मुलांनी परिपाठात प्रश्नोत्तर सदर करण्याचा एक नवीन उपक्रम तयार केला आहे.
या शाळेचे मूल्यवर्धन शिक्षक प्रफुल्ल भोगे स्पष्ट करतात की, “या 15 मिनिटांच्या सत्रात मुले गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत एकमेकांना प्रश्न विचारतात. दरम्यान, प्रश्न विचारणारी मुले स्टेजवर उभे राहून प्रश्न विचारतात. इतर सर्व मुले उत्तर देण्यासाठी हात वर करतात. त्यानंतर शिक्षक ज्या मुलाला उत्तर विचारतात तो उत्तर देतो. उत्तर चुकीचे असेल तर इतर मुलाला संधी देण्यात येते. जर कोणत्याही मुलाला बरोबर उत्तर देता आले नाही तर तेव्हा प्रश्न विचारणारे मूल उत्तर देते.”
यामुळे मुलांचे सामान्य ज्ञान वाढत आहे. त्यांना स्थानिक माहितीही मिळत आहे. जसे, त्यांना माहीत आहे की त्यांच्या गावाचा सरपंच कोण आहे, किंवा ग्रामसेवकाचे नाव काय आहे? त्याचप्रमाणे त्यांच्या तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याविषयीही त्यांना माहिती मिळू लागली आहे.
वर्धा शहरापासून ३० किमी अंतरावर सेलू तालुक्या अंतर्गत या शाळेत दोन शिक्षक आणि २१ मुले आहेत. जुलै २०१८ पासून येथे मूल्यवर्धन सत्रे घेतली जात आहेत. त्याच बरोबर बोरखेडी (कला) गावात साधारणतः साडेपाचशे लोकसंख्या असलेल्या गावात मजुर आणि लहान शेतकरी कुटुंबे आहेत.
यासाठी सुरु केली प्रश्नोत्तरे
प्रफुल्ल भोगे म्हणतात की जुलै 2019 मध्ये मूल्यवर्धनच्या एका उपक्रमादरम्यान मुलांना त्यांच्या शेजार्यांविषयी माहिती द्यायची होती. यावेळी त्यांनी मुलांना आपल्या घराचा पूर्ण पत्ता देण्यास सांगितले. तथापि, केवळ दोन मुलांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. इयत्ता चौथीची मुलेही आपल्या घराचा पूर्ण पत्ता देऊ शकत नाहीत हे जाणून त्यांना वाईट वाटले.
यानंतर, प्रफुल्ल भोगने आठवड्यातून दोनपेक्षा अधिक वेळा मूल्यवर्धन सत्रे घेण्याचे ठरविले. ते स्पष्ट करतात, “मूल्यवर्धन सत्राच्या वेळी मी स्वत: ची ओळख आणि स्वत:च्या क्षमता यांच्याशी संबंधित उपक्रमांवर जोर दिला. मला असेही वाटले की अशा उपक्रमांमुळे मुलांचे सामान्य ज्ञान वाढत आहे. परंतु, मला असे वाटले की शाळेतील सर्व मुलांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी दररोज एक उपक्रम आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या सहकारी शिक्षक आणि मुलांसमवेत एकत्रित प्रश्नोत्तर उपक्रमासाठी एक योजना तयार केली. “
प्रश्नोत्तरे तयार करण्यासाठी मुले शिक्षकांची मदत घेतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने कोणते प्रश्न विचारणे योग्य आहे ते ठरवतात. कारण, जर एखादा प्रश्न प्राथमिक शाळेत शिकणार्या मुलांच्या पातळीपेक्षा उच्च असेल तर शिक्षक असे प्रश्न टाळण्याचे सुचवितात. विचारले जाणारे प्रश्न एक दिवस आधी तयार केले जातात.
मुलांसाठी फायद्याचे
प्रफुल्ल भोग म्हणतात की दररोज प्रश्नोत्तरे आयोजित केल्यामुळे अधिकाधिक मुले एकमेकांशी चांगले संवाद साधत आहेत. त्यांच्यात उत्सुकतेची पातळी वाढत आहे. आता त्यांना पूर्वीपेक्षा अधिक व्यावहारिक ज्ञान मिळत आहे.
त्याच वेळी, ज्या मुलांना आपल्या घराचा पत्ता योग्यरित्या सांगता येत नव्हता, ते पूर्ण पत्ता सांगतात. यात पहिली आणि दुसरीतील लहान मुलांचा समावेश आहे.
प्रफुल्ल भोग म्हणतात, ” प्रश्नोत्तर सत्रात मुलांना प्रश्न विचारण्यासाठी को-या पानांवर प्रश्नोत्तरे शुद्ध आणि स्पष्ट लिहावी लागतात. यामुळे त्यांचे लिखाण सुधारत आहे. तसेच, प्रश्न विचारण्याचे आणि उत्तरे देण्याचे कौशल्य मुलांमध्ये विकसित होत आहे.
मूल्यवर्धनमधून हे शिकलो
येथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रश्न बनवताना आणि लिहिताना मुले मूल्यवर्धनची शैक्षणिक पद्धत अवलंबत आहेत. ते जोडी किंवा गटाच्या माध्यमातून आपले काम पूर्ण करीत आहेत.
प्रफुल्ल भोग म्हणतात, “कधीकधी काही मुले प्रश्नोत्तराच्यावेळी व्यत्यय आणतात. त्या दरम्यान त्यांना गटात जबाबदारी दिली जाते. कधीकधी त्यांना प्रश्न सुचवायला सांगितले जाते.”
दुसरीकडे, प्रफुल भोग मुलांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्याचा विचार करीत आहेत. ते म्हणतात, “लवकरच आम्ही शाळेच्या आवारात सामान्य ज्ञानाशी संबंधित मासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार करीत आहोत. गावातील लोकही अशा कार्यक्रमांमध्ये सामील होऊ शकतात.”