Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.
आजच्या शिक्षणप्रणालीत केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वच्छता ही केवळ वैयक्तिक सवय नसून ती आरोग्यदायी जीवनशैलीचा पाया आहे. शाळेमध्ये राबविण्यात येणारे ‘मूल्यवर्धन उपक्रम’ विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास प्रभावी ठरतात. प्रस्तुत केस स्टडीमध्ये अशाच एका विद्यार्थ्याच्या स्वच्छतेच्या सवयींमध्ये मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून झालेल्या लक्षणीय बदलाचा अभ्यास करण्यात आला आहे.
दक्षिण गोवा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळा, फातोर्पा ही केपे (Quepem) तालुक्यातील मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेत इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत वर्ग आणि ३ शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील एक मुख्याध्यापक, एक सहशिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक आहे. शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या २८ आहे. यापैकी सुमारे ४०% विद्यार्थी स्थलांतरित कुटुंबांतील आहेत. पालकांचा मुख्य व्यवसाय रोजंदारी असून त्यांचा आर्थिक स्तर निम्न स्वरूपाचा आहे.
अस्वच्छतेच्या सवयी
नोव्हेंबर २०२५ पासून शाळेत आठवड्यातून दोनवेळा मूल्यवर्धन उपक्रम घेतले जातात. मुख्याध्यापिका रूपाली गावकर यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले असून त्यांनी सहकारी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले आहे. त्या प्रामुख्याने इयत्ता ३ री व ४ थी असे दोन वर्ग एकत्र घेतात. त्यांना या वर्गांतील काही विद्यार्थ्यांचे अस्वच्छ राहणे नेहमीच त्रासदायक वाटायचे. इयत्ता ४ थीमध्ये शिकणारा दिपेश मोने (नाव बदललेले आहे) हा विद्यार्थी असून तो कोंकणी भाषा बोलतो. त्याचा स्वभाव हट्टी आणि त्याची शैक्षणिक प्रगती सरासरी आहे.
दिपेश हा नेहमी घाणेरडा गणवेश, वाढलेली व घाणेरडी नखे, विस्कटलेले केस अशा अस्वच्छ अवस्थेत शाळेत येत असे. त्यासंदर्भात शिक्षकांनी अनेक वेळा सूचना देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणेचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. वर्गात जास्त विद्यार्थी संख्या असल्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन करणे, गृहभेटी देणे कठीण होते. त्यांच्या वर्तनामागील मूळ कारण, घरचे वातावरण, आर्थिक परिस्थिती समजून घेणे अवघड जात होते. मात्र आश्चर्य म्हणजे मूल्यवर्धनमुळे त्याच्या अस्वच्छतेच्या सवयी बदलल्या.
मूल्यवर्धनातून स्वच्छतेच्या सवयी
यावर काय उपाययोजना केल्या असे रूपाली गावकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, “मी मूल्यवर्धनमधील इयत्ता २ रीचा ‘माझे आरोग्य, माझे नियम’ हा उपक्रम घेतला होता. एकाच वर्गात इयत्ता २ री व ४ थी चे विद्यार्थी एकत्र बसले होते. मी विद्यार्थ्यांना ‘चला विचार करूया’ ही कृती स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास सांगितली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सादरीकरण घेतले आणि ‘हात धुणे’ हा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा घेतली.”
रूपाली गावकर पुढे म्हणाल्या, “जोड्यांनी ‘चर्चा करूया’ ही कृती पूर्ण केल्यावर एका जोडीला त्यांचे मुद्दे वर्गासमोर सादर करण्यास सांगितले. योगायोगाचा भाग असा की, ती दिपेशची जोडी होती. जोड़ीचे मुद्दे मांडून झाल्यावर इतर विद्यार्थ्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले.”
जोडीचर्चेचे मुद्दे कोणते होते, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की मूल्यवर्धन पुस्तकात दिलेले प्रश्न जोडी चर्चेसाठी दिले आहेत. दात कसे घासावेत? हात केव्हा आणि कसे धुवावेत? नखांची स्वच्छता कशी ठेवावी, अस्वच्छ राहण्याचे परिणाम असे जोडीचर्चेचे मुद्दे होते.
स्वच्छतेच्या सवयींचे परिणाम
त्याचा काय परिणाम झाला असे विचारले असता रूपाली गावकर म्हणल्या, “आपण अशा स्वच्छतेच्या सवयी का पाळाव्यात? असे मुलांना विचारले. मुलांनी खूप मुद्दे मांडले. त्यावर दिपेशनेही मत व्यक्त केले. दिपेशच्या अस्वच्छतेकडे अप्रत्यक्षपणे मुलांचे लक्ष वेधले गेले आणि मुले हसायला लागली. त्यामुळे दिपेशला लाज वाटली. तो बोलायचा थांबला. मग त्याला धीर दिला. ‘तू स्वच्छ राहिलास तर तुला अपमानित झाल्यासारखे वाटणार नाही’ असे समजावून सांगितले. “यापुढे मी स्वच्छ राहणार” असे तो म्हणाला. हीच घटना त्याचा स्वच्छतेच्या सवयी बदलण्यास टर्निंग पॉईंट ठरली.”
याबाबत दिपेशबरोबर बोलण्याचा योग आला. त्याला विचारले, “सगळे म्हणत होते की दिपेश अस्वच्छ राहतो, पण तुझा गणवेश स्वच्छ आहे, केस व्यवस्थित केले आहेत. तुला असे पाहून खूप छान वाटले.” तेव्हा तो म्हणाला, “मूल्यवर्धनमधला ‘माझे आरोग्य, माझे नियम’ हा उपक्रम बाईनी घेतला, तेव्हा मला स्वच्छ कसे राहायचे ते समजले. अस्वच्छ राहिल्याने काय होते ते लक्षात आले. मग मी स्वच्छ राहायचे ठरवले.”
दिपेशच्या बाबतीत आलेल्या अनुभवावरून असे लक्षात येते की, मुलांना ‘स्वच्छ रहा’ असा फक्त उपदेश करणे पुरेसे नसते. त्यामागील कारणे लक्षात आणून देणे, अस्वच्छतेचे परिणाम लक्षात आणून देणे, स्वच्छतेचे उपाय सुचवणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागते. मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये या सर्व गोष्टी असल्याने विद्यार्थ्यांमधील वर्तनबदल सहज होतात.