प्रस्तावना
विद्यार्थ्यांची अनियमित उपस्थिती ही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसमोर मोठे आव्हान ठरते. विद्यार्थी शाळेत नियमित येत नसल्यास त्यांच्या अध्ययनात खंड पडतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शाळेशी असलेली भावनिक बांधिलकीही दुर्बल होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आवडी, गरजा आणि भावनांचा विचार करून राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच शाळेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. सदर केस स्टडीमध्ये मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सकारात्मक बदलाचा अभ्यास करण्यात आला आहे.
शाळेची पार्श्वभूमी
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील आसोली हे एक छोटेसे गाव आहे. या गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, आसोली येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ६६ आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. साईनाथ बोपचे यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा शैक्षणिक व सर्वांगीण विकासाचा प्रवास सुरू आहे. नोव्हेंबर २०२४ पासून शाळेत महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा ‘मूल्यवर्धन ३.०’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात, सहभागात आणि उपस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समस्येची जाणीव
इयत्ता सहावीमध्ये शिकणारे सचिन ढगे आणि राजेश पाटीले (नावे बदललेली आहेत.) हे दोन विद्यार्थी शाळेत अत्यंत अनियमित होते. शाळेत आले तरी त्यांचे वर्गातील लक्ष विचलित असायचे. ते अनेकदा गोंधळ घालणे, भांडणे किंवा इतर विद्यार्थ्यांना त्रास देणे अशा वर्तनामुळे शिक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असत. त्यांना अनेक वेळा समजावून सांगितले, पालकांशी संवाद साधला; परंतु त्यांच्या उपस्थितीत आणि वर्तनात अपेक्षित बदल दिसून येत नव्हता. हळूहळू शिक्षकांनीही त्यांच्याविषयी अपेक्षा कमी केल्या आणि परिस्थिती जशीच्या तशी राहिली.
शिक्षक श्री. प्रफुल्ल गायकवाड म्हणाले, “सचिन ढगे आणि राजेश पाटील हे वर्गात आले की गोंधळ आणि मारामारी करायचे. वर्गात लक्ष देत नव्हते. मूल्यवर्धन उपक्रम सुरू झाल्यानंतर गटात बसून काम करताना त्यांना स्वतःची जबाबदारी समजू लागली. सहयोगी खेळामुळे त्यांना आनंद मिळू लागला. त्यामुळे त्यांच्या शाळेतील उपस्थितीत वाढ झाली आणि वर्तनातही सकारात्मक बदल झाले.”
“मूल्यवर्धन प्रशिक्षणाने मला शिकवण्याची नवी दृष्टी दिली. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांच्या मनापर्यंत पोहोचून त्यांना शाळेची ओढ लावणे हे अधिक महत्त्वाचे आहे. सचिन आणि राजेश यांच्यातील बदल हे माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे,” असे श्री. प्रफुल्ल गायकवाड म्हणाले.
केलेले महत्त्वपूर्ण प्रयत्न
मूल्यवर्धन ३.० च्या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी मुख्याध्यापकांनी श्री. प्रफुल्ल गायकवाड यांची निवड केली. या प्रशिक्षणातून त्यांना विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, भावनिक विकास आणि सकारात्मक प्रोत्साहन यांची नवी दृष्टी मिळाली. प्रशिक्षणानंतर त्यांनी आपल्या वर्गात काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.
पारंपरिक अध्यापनाऐवजी विद्यार्थ्यांना गटांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली. सहयोगी खेळ, गटचर्चा आणि सामूहिक कृती यांना प्राधान्य देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य, संवाद आणि सहभाग वाढू लागला.
पूर्वी वारंवार ओरडा खाणाऱ्या सचिन आणि राजेश यांना लहान-लहान जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यांच्या प्रत्येक सकारात्मक कृतीचे वर्गासमोर कौतुक करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःबद्दलचा आदर आणि आत्मविश्वास वाढू लागला.
शाळेतील वातावरण भीतीमुक्त, आनंदी आणि विद्यार्थीकेंद्रित बनविण्यात आले. विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळू लागली. शिक्षक-विद्यार्थी संबंध अधिक मैत्रीपूर्ण झाले.
पालक-विद्यार्थी संवाद वृद्धिंगत झाला
घरी करावयाच्या विविध कृतींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढला. पालकांनी मुलांच्या शिक्षणात अधिक रस घेण्यास सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला.
झालेले सकारात्मक बदल
मूल्यवर्धन उपक्रम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल दिसून येऊ लागले. सचिन आणि राजेश यांची अनियमितता जवळजवळ पूर्णपणे कमी झाली. विशेष म्हणजे, सचिन हा शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असतानाही केवळ ‘आज मूल्यवर्धनचा तास आहे’ या उत्साहाने शाळेत येऊ लागला. शाळेविषयी निर्माण झालेली ही ओढ उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारी होती.
विद्यार्थी स्वतःहून विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. मूल्यवर्धनच्या तासाची ते उत्सुकतेने वाट पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर शिकण्याचा आनंद दिसू लागला.
पूर्वी वारंवार भांडण करणारे विद्यार्थी आता गटात एकत्रितपणे काम करू लागले. त्यांच्यामध्ये सहकार्य, समजूतदारपणा आणि परस्पर आदराची भावना विकसित झाली. वर्गातील वातावरण अधिक सकारात्मक आणि सुसंवादी बनले.
या उपक्रमामुळे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांचे महत्त्व लक्षात आले. टीका आणि शिक्षा यापेक्षा कौतुक, प्रोत्साहन आणि विश्वास यांचा विद्यार्थ्यांवर अधिक प्रभाव पडतो, याची जाणीव झाली.
समारोप
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाची गोडी लागली नाही, तर शाळेशी त्यांचे भावनिक नातेही दृढ झाले. शिक्षकांचा दृष्टिकोन ‘टीका करण्याकडून कौतुक करण्याकडे’ वळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि शाळेविषयीची आवड निर्माण झाली. सचिन आणि राजेश यांच्या उपस्थितीत झालेला सकारात्मक बदल हा मूल्यवर्धन उपक्रमाच्या परिणामकारकतेचा जिवंत पुरावा आहे. ही केस स्टडी इतर शाळांसाठीही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरावी, हीच अपेक्षा.

– श्री. प्रफुल्ल गायकवाड (SRG)