मूल्यवर्धन उपक्रमांतून घडलेली दयाळूपणाची कहाणी

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकीच त्यांच्या मनातील संवेदनशीलता, सहानुभूती आणि दयाळूपणा जपणेही अत्यंत आवश्यक बनले आहे. शाळेत राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला केवळ आकार देत नाहीत, तर त्यांच्या विचारांमध्ये आणि वर्तनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. अशाच छोट्याशा पण हृदयस्पर्शी घटनांतून विद्यार्थ्यांमध्ये दडलेला दयाळूपणाचा गुण सर्वांसमोर आला. मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे घडलेली ही कहाणी माणुसकी जपणाऱ्या शिक्षणव्यवस्थेची प्रेरणादायी झलक आहे.

मांगदरी शाळेतील मूल्यवर्धनाची सुरुवात 

पुणे जिल्ह्यातील वेल्हे पासून सुमारे १५ किमी अंतरावर, राजगडच्या परिसरातील एका छोट्याशा मांगदरी  जिल्हा परिषद शाळेत एक सुंदर परिवर्तन घडत आहे. इयत्ता १ ते ७ पर्यंत केवळ १७ विद्यार्थी (१० मुले व ७ मुली) आणि ३ शिक्षिक असलेल्या या शाळेत जानेवारी २०२६ पासून मूल्यवर्धन उपक्रम आयोजित करणे सुरू करण्यात आले. हे उपक्रम केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये दयाळूपणा, सहकार्य आणि आपुलकीची भावना निर्माण करणारे ठरत आहेत. 

एकमेकांना मदत करणारी मुले घडवण्याचा निर्धार

शाळेतील शिक्षिका सौ. वर्षा भोज सांगतात, “माझ्या समोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे वेगवेगळ्या इयत्तांमधील मुलांमध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना कशी निर्माण करावी. कारण मी नव्याने या शाळेमध्ये रुजू झाले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेतील मुलांना समजून घेणे आवश्यक होते. यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री. साधू हारपुडे आणि शिक्षक श्री अशोक डोंबे सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या दोघांशिवाय ही भावना मुलांमध्ये निर्माण करणे शक्य नव्हते.”  

मूल्यवर्धन उपक्रमांची सुरुवात  

मुलांमध्ये दिसून आलेले बदल सांगताना त्या म्हणल्या, “जवळपास सर्व मूल्यवर्धन उपक्रमात मुलांना एकत्रित शिकण्यासाठी प्रेरित केले जाते. मुलांमध्ये मदतीची भावना विकसित करण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम मूल्यवर्धन उपक्रम आठवड्यातून २ वेळा ठरवून दिल्याप्रमाणे घेण्यास सुरुवात केली. उपक्रम घेतल्यानंतर मुलांना त्याविषयी काय करता येईल, यावर चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यावर मुलांनी नाटक सादर करतो असे सुचवले. मग एकेक विषय घेऊन मुलांनी एकमेकांच्या मदतीने नाटक बसवण्यास सुरुवात केली. या नाटकांचे व्हिडिओही बनवले. नाटक फक्त एका इयत्तेपुरते मर्यादित न राहता पहिली ते सातवीमधील सर्व मुलांनी यात सहभाग घेतला. मूल्यवर्धन उपक्रम सुरू झाल्यानंतर हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले.” 

नाटकातून घडले सहकार्य  

याचे कोणते परिणाम दिसून आले असे विचारले तेव्हा त्या म्हणल्या, “परिपाठाचे स्वरूप बदलले. मोठी मुले आपापल्या परीने लहान मुलांना मदत करू लागली. एकंदर शाळेमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद, आत्मविश्वास आणि सहकार्य वाढले. तसेच मूल्यवर्धनचे परिणाम शाळेबाहेरही दिसून आले.” याची काही उदाहरणे सांगू शकाल का असे विचारले असता त्यांनी सांगितले, “गावातील यात्रेमध्ये कडक उन्हात अनेक वृद्ध आणि लहान मुलांना त्रास होत असल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत यात्रेत आलेल्या लोकांना पाणी वाटप करण्याचे ठरवले. दिवसभर उभे राहून सेवा केली. कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली. गावातील युवकही त्यांच्या मदतीला पुढे आले. सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सत्कार करण्यात आला.” 

महिलांविषयी आदर आणि सहकार्याची जाणीव

दुसरे उदाहरण सांगताना त्या म्हणाल्या, “महिलांविषयी सहकार्याची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळेत मुलांनी एक अनोखा उपक्रम घेतला. त्यात मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या वेशभूषा साकारत महिलांचे योगदान अधोरेखित केले. या उपक्रमात पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. मुलांनी साकारलेल्या विविध वेशभूषा आणि महिलांप्रती व्यक्त केलेला सन्मान पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यातून महिलांप्रती सहकार्याची तसेच आदराची भावना वाढीस लागलेली जाणवली.”  

उत्तम माणूस घडविणाऱ्या शिक्षणाची प्रेरणादायी झलक

आज या शाळेत एक वेगळेच चित्र दिसते. विद्यार्थी स्वतःहून एकमेकांना मदत करतात. शिकण्याची प्रक्रिया आनंदी आणि सहकार्यपूर्ण झाली आहे. मूल्ये फक्त शिकवली जात नाहीत, तर जगली जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये बंधुता आणि आपुलकीची भावना दृढ झाली आहे. शाळेत दिले जाणारे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाला केवळ शैक्षणिक यशाकडे नाही, तर उत्तम माणूस बनण्याच्या दिशेनेही प्रेरित करते. मूल्यवर्धनमधून साकारलेली ही दयाळूपणाची कहाणी इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची आशा निर्माण करते.

Share the Post:

Recent Blogs