Shantilal Muttha Foundation (SMF) is a non-profit organization committed to ensuring every child receives an education that nurtures them into compassionate, responsible citizens.
महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६)
राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावी, व्यापक व्हावी तसेच दीर्घकालीन परिणाम मूल्यांकनाची पायाभरणी करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी ‘पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणा’चा एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. ३५ जिल्हे व ५८ तालुक्यातल्या मराठी व उर्दू माध्यमांच्या ४६४ शाळांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणास सहभागी सर्वच घटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांनी मान्यता दिलेल्या या सर्वेक्षणात वर्गात मूल्यवर्धन कसे चालते, मूल्यवर्धन उपक्रमांमधून विद्यार्थी काय शिकतात आणि शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष अंमलबजावणीला कसे सहकार्य करीत आहेत अशा बाबी या सर्वेक्षणातून निष्पन्न होणार आहेत. शासकीय व अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातले ४०३८ विद्यार्थी, ६७३ शिक्षक, ६७३ पालक तसेच मूल्यवर्धनशी संबंधित ५८ क्लस्टर रिसोर्स पर्सन, ५८ गटशिक्षणाधिकारी आणि ३५ जिल्हा शिक्षणाधिकारी-DIET प्राचार्य अशा एकूण १५१ अधिकाऱ्यांशी या सर्वेक्षणाद्वारे प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

या अभ्यासाचा मुख्य उद्देश मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट सामाजिक-भावनिक-नैतिक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी, शिक्षकांच्या अध्यापन पद्धती आणि शिक्षणासाठी शिक्षकांना मिळणारे व्यवस्थात्मक सहकार्य व पाठिंबा यांचा अभ्यास करणे हा होता. या अभ्यासातील निष्कर्षांमुळे कार्यक्रम अंमलबजावणीत सुधारणा करणे, उपलब्ध साधनांवर, पुराव्यावर आधारित निर्णय प्रक्रियेसाठी अहवाल व डॅशबोर्ड तयार करणे तसेच भविष्यातील मूल्यवर्धन उपक्रमांच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष निश्चित करणे शक्य होणार आहे.

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणाचे टप्पे
साधनांची अंतिम रूपरेषा- २९ नोव्हेंबर २०२५
साधनांची पायलट चाचणी- १ ते ८ डिसेंबर २०२५
क्षेत्रीय तपासकांचे प्रशिक्षण- १७ ते २० डिसेंबर २०२५
डेटा संकलन, विश्लेषण व अहवाल लेखन- जानेवारी २०२६

या अभ्यासाची रचना २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या मूल्यवर्धन कार्यक्रम मूल्यमापनावर आधारित असून, त्यासाठी वापरलेली कार्यपद्धती व साधने SCERT कडून मान्यताप्राप्त आहेत. हे अभ्यास सर्वेक्षण SMF हेड ऑफिस आणि संबंधित जिल्ह्यातल्या प्रशिक्षित SMF टिमद्वारे शास्त्रीय
व मान्यताप्राप्त संशोधन साधनांचा वापर करून संमिश्र पद्धतीने राबविण्यात आले. ज्यात संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही तंत्रांचा वापर करण्यात आला. यामुळे इयत्ता, शाळेचा संदर्भ आणि सामाजिक-लोकसंख्यात्मक घटकांनुसार तुलनात्मक विश्लेषण करण्यास मदत होणार
आह

पायाभूत अभ्यासाची माहिती संकलित करण्यासाठी (i) निरीक्षण (ii) साधनांचे प्रशासन आणि (iii) मुलाखती या पद्धती वापरण्यात आल्या. तसेच रेटिंग स्केल्स आणि वर्ग निरीक्षण यांचा समावेश होता. यात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन साधने, शिक्षक मुलाखत साधन, पालकांचे निरीक्षण फॉर्म, शासकीय अधिकाऱ्यांसाठी मुलाखत वेळापत्रक तसेच वर्गनिरीक्षणासाठी विशेष फॉर्म यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सामाजिक-भावनिक-नैतिक क्षमतांशी संबंधित ठोस परिस्थितीवर आधारित प्रश्नांद्वारे करण्यात आले. यामुळे त्यांच्या विचारप्रक्रिया, निर्णयक्षमता आणि मूल्यांबद्दलची जाणीव स्पष्टपणे समोर येऊ शकणार आहे.

शिक्षक व पालक मुलाखतींमधून मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांमधील वर्तनात्मक बदल आणि शिकण्यावरील परिणाम यांची गुणात्मक माहिती मिळाली. वर्गनिरीक्षण साधनांच्या माध्यमातून अध्यापन पद्धती, विद्यार्थी सहभाग, शिस्त, सहकार्य व सकारात्मक वातावरण यांचे प्रत्यक्ष निरीक्षण नोंदविण्यात आले. ही सर्व साधने SCERT-मान्य असून NCF 2023 च्या शिफारशींशी सुसंगत आहेत. त्यामुळे संकलित माहिती केवळ संख्यात्मक नसून संदर्भाधारित, विश्वासार्ह आणि तुलनात्मक विश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अभ्यासाशी संबंधित सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून SCERT, महाराष्ट्र यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाही.

महाराष्ट्रातल्या शहरी, ग्रामीण ते आदिवासी भागातल्या गावापासून लांब जंगलातील शाळा अशा सर्व शाळांचा या अभ्यासात समावेश होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भेट दिलेल्या शाळांमधील वर्गनिरीक्षणही करण्यात आले. अभ्यासात सहभागी झालेले एक सदस्य नमूद करतात, ‘आजचा संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात गेला आणि तो अनुभव अत्यंत समाधानकारक व प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.’

व्यापक स्तरावर राबविलेला हा ‘पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षण’ मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतले एक महत्त्वपूर्ण पाऊल होय. हा व्यापक अभ्यास राज्यातील मूल्यशिक्षण धोरणांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल.
