हात धरून शाळेकडे: वंचित मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची धडपड

शाळेची घंटा वाजते आणि मुले वर्गाकडे धाव घेतात. काही मुलांसाठी शाळेचा हा प्रवास इतका सहज सोपा नसतो. कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांसोबत वस्तीत राहणारी मुले, बांधकामाच्या ठिकाणी वाढणारी बालके, औद्योगिक कंत्राटी कामगारांच्या कुटुंबातील मुले—यांच्यासाठी शाळेपर्यंत पोहोचणे हेच एक आव्हान होते. शाळेतील शिक्षकांनी या मुलांची वाट पाहत बसण्याऐवजी शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने शिक्षणाची वाटच त्यांच्या वस्तीत नेली.

शाळेची पार्श्वभूमी

पिंपरी-चिंचवड हा प्रगत औद्योगिक भाग असलेला परिसर आहे. एकीकडे उंचच उंच चकचकीत इमारती आणि दुसरीकडे या औद्योगिक भागाला अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होणारा झोपडपट्टीचा परिसर. 

अशाच गजबजलेल्या वातावरणात भरणारी इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असणारी रेणुकादेवी प्राथमिक शाळा. या शाळेत परराज्यांतून रोजगाराच्या शोधात आलेल्या कचरावेचक, बांधकाम मजूर आणि औद्योगिक कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांतील २५० पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात. स्थलांतरित कुटुंबांची अस्थिर जीवनशैली, आर्थिक अडचणी, भाषेची समस्या आणि पालकांचा रोजगार यांचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे दिसून येतो.

जाणवलेली समस्या

शाळेला भेट दिल्यावर असे जाणवले की, काही विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत आणणे हेच एक मोठे आव्हान आहे. पालक दिवसभर कामावर असल्यामुळे त्यांना मुलांच्या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. काही मुलांना शाळेत येण्यास सोबत कोणी नसते तर काही मुलांच्या वेगळ्याच समस्या असतात.  स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यताही असते. या परिस्थितीत केवळ वर्गात अध्यापन पुरेसे नसून शाळेचे वातावरण आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणे आणि विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, हे शिक्षकांनी ओळखले आहे.

शाळेने केलेला हस्तक्षेप

विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती या समस्येवर शाळेने अत्यंत संवेदनशील आणि कृतीशील दृष्टिकोन स्वीकारला आहे. शिक्षिका स्वाती शिर्के मॅडम यांनी सांगितले, “आमच्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम घेतले जातात. माझे गेल्यावर्षी मूल्यवर्धन प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणाबाबत मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांच्याशी चर्चा केली. तेव्हापासून आम्ही शाळा भरण्याच्या आधी आम्हाला दररोज कोण शाळेत आले नाही, याचा शोध घेतो. एखादे मूल शाळेत आले नसेल तर आमच्यापैकी एक शिक्षक स्वतः त्या मुलाच्या वस्तीत जातात. पालकांशी संवाद साधतात. मुलाला शाळेत पाठविण्याचे महत्त्व समजावून सांगतात. गरज भासल्यास मुलांना स्वतः शाळेत घेऊन येतात. अनेक मुलांना हिंदी भाषा अधिक परिचित असल्याने आम्ही मुलांशी हिंदी भाषेतून अधिकाधिक संवाद साधतो. त्यामुळे मुलांना शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधता येतो. या संवादातून आपलेपणा आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.”

मूल्यवर्धन उपक्रम घेताना शिक्षिका स्वाती शिर्के...

मूल्यवर्धनातून व्यक्तिमत्त्व विकास

पुढे त्यांनी सांगितले, “मूल्यांच्या विकासासाठी मूल्यवर्धनातील उपक्रम आनंददायी आणि सहयोगी पद्धतीने राबविले जातात. सहकार्य, जबाबदारी, स्वच्छता, परस्पर आदर, संवेदनशीलता आणि मदतीची भावना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनातून विकसित व्हावी, यासाठी विविध कृती, खेळ, संवाद आणि गटकार्याचा वापर केला जातो. विशेषतः वेगवेगळ्या भाषिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी सहयोगी उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. मुलांना एकमेकांना समजून घेण्याची, मदत करण्याची आणि एकत्र शिकण्याची संधी मिळते.”

स्वच्छतेसाठी संवेदनशील प्रयत्न

काही विद्यार्थी आंघोळ न केलेले किंवा अस्वच्छ अवस्थेत शाळेत येतात. अशा परिस्थितीत शिक्षक विद्यार्थ्यांना नाकारत नाहीत किंवा त्यांना कमी लेखत नाहीत. उलट, प्रेमाने आणि समजूतदारपणे त्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगतात. या कृतीतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वच्छतेबरोबरच त्यांच्या आत्मसन्मानाचीही जपणूक केली जाते. शिक्षणासोबत चांगल्या जीवनशैलीच्या सवयी विकसित करणे हीदेखील शाळेची जबाबदारी आहे, अशी भूमिका येथे दिसून आली.

शिक्षकांचा आर्थिक सहभाग

मुख्याध्यापक श्री. तिखे सर यांनी सांगितले, “अनेक विद्यार्थ्यांना शाळेत आणताना वाहतुकीची अडचण निर्माण होत आहे. त्यांना शाळेत येण्यासाठी रिक्षा करावी लागते. अनेक पालकांना मुलांच्या रिक्षाचे पैसे वेळेवर देणे शक्य होत नाही. अशावेळी सर्व शिक्षक स्वतःचे पैसे एकत्र करून रिक्षाचा खर्च भागवतात. आर्थिक परिस्थिती कोणत्याही मुलाच्या शिक्षणाच्या आड येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. वह्या, पुस्तके, लेखनसाहित्य तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक सातत्याने पाठपुरावा करतात.” 

मुलांच्या कलागुणांना वाव

मुख्याध्यापक श्री. तिखे स्वत: कलाप्रेमी आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे शाळेला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. अनेक मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण केली आहे. अनेक मुले गायन आणि वादनात पारंगत झाली आहेत. इतर क्षेत्रातही गुणवान असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली.

हार्मोनियम वादन करताना विद्यार्थिनी…

रेणुकादेवी प्राथमिक शाळा, मोरवाडीची ही केस स्टडी दाखवून देते की, वंचित किंवा स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शाळेतील अध्यापन पुरेसे नसते; त्यासाठी शिक्षकांनी मुलांच्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीपर्यंत पोहोचणे आवश्यक असते.

रेणुकादेवी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ही भूमिका इतर शाळांसाठीही अनुकरणीय आणि प्रेरणादायी ठरणारी आहे.

शब्दांकन – बाबाजी म्हस्के 

Share the Post:

Recent Blogs