विद्याधर शुक्ल (सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन)
२८ एप्रिल, २०२५ या दिवशी मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यवाही आगामी पाच वर्षे करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. मूल्य शिक्षणाच्या विद्यमान अंमलबजावणीला संवैधानिक मूल्यांची प्रभावी रुजवण करणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची जोड देऊन ते अधिक सरस करण्याच्या वाटेवर राज्याने एक दमदार पाऊल पुढे टाकले.
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे पाहिले पर्व
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे बीज याच राज्याच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये २००९ मध्ये रुजले. प्रायोगिक रीतीने विकसित होण्याच्या प्रवासात मूल्यवर्धनने अनेक राज्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यात मूल्यवर्धनचे पहिले राज्यव्यापी पर्व २०१६ ते २०२० या कालावधीत पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) या समन्वयक संस्थेच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. त्या योगाने पहिली ते पाचवीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६७,००० शाळांपर्यंत संविधानातील मूल्यांचे संस्कार झिरपले. या कालावधीत सहभागी शिक्षकांचे मूल्यवर्धनविषयीचे स्वानुभव ‘मी आणि मूल्यवर्धन’ या पुस्तिकेत, तसेच एससीईआरटीने संकलित केलेले निवडक यशस्वी अनुभव ‘यशोगाथा’ या पुस्तिकेत प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धन विषयाभोवती गुंफलेली ४५०० पोस्टर्स, शिक्षकांकडून स्वानुभव कथन करणाऱ्या २१,००० लहान व्हिडिओंची निर्मिती, मूल्यवर्धनवरील राज्यव्यापी जिल्हा मिळावे या कार्यक्रमातील उत्साही सहभागाची साक्ष अजूनही देत आहेत.
मूल्यवर्धनचे नवे पर्व
आत्ताच्या दुसऱ्या नव्या पर्वात मूल्यवर्धन २.० या मूल्यवर्धनच्या विस्तारित आवृत्ती आधारे अंमलबजावणी सुरू आहे. NCF २०२३ आणि SCF २०२४ या दस्तावेजांमध्ये मूल्यशिक्षणाचे बदललेले स्वरूप ‘सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास’ (SEED) असे आहे. त्यानुसार अपेक्षित मूल्यशिक्षणाचे उद्देश, मूल्ये रुजविण्याच्या योग्य शैक्षणिक पद्धती, विद्यार्थी मूल्यमापन याबाबतच्या सर्व अपेक्षांशी सुसंगत राहून मूल्यवर्धन २.० या आवृत्तीची निर्मिती केली आहे. नवीन धोरणात मूल्यशिक्षण थेट पद्धतीने (direct method) देण्याच्या पर्यायाला अनुसरून मूल्यवर्धनमध्ये स्वतंत्र उपक्रमातून मूल्यशिक्षणाचे नियोजन केले आहे.
मागील मूल्यवर्धन फेरीमधील अंमलबजावणी पहिली ते पाचवीपर्यंत होती. आता ती आठवीपर्यंत होत आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबर राज्यातील सर्व अनुदानित शाळांचाही कार्यक्रमात समावेश केला आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षक उपक्रमपुस्तिकांच्या मुद्रित साहित्याला २०० दृकश्राव्य चित्रफितींची जोड दिली आहे.
मूल्यवर्धन कार्यकमाचे नेमके वेगळेपण काय आहे हे लक्षात येण्यासाठी त्याचे शैक्षणिक स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
मूल्यवर्धनचे शैक्षणिक अंतरंग
मूल्यवर्धनमध्ये अंगिकारलेली मूल्ये
भारतीय संविधानाने उद्याचे नागरिक उत्पादक असावेत, ते समतेवर आधारित, सर्वांना सामावून घेणारा आणि बहुविधतेचा आदर करणारा समाज घडवण्यासाठी सक्रिय योगदान देणारे असावेत असे स्वप्न पाहिले. म्हणूनच NCF २०२३ आणि SCF २०२४ यामध्ये ते शिक्षणाचे ध्येय म्हणून स्वीकारले आहे.
या ध्येयालाच अनुसरून मूल्यवर्धन कार्यक्रमाची रचना, विद्यार्थी संविधानाच्या उद्देशिकेत अंतर्भूत मूल्ये मनापासून जपणारे उद्याचे जबाबदार संवेदनशील आणि उत्पादक नागरिक घडावेत, हा हेतू ठेऊन केली आहे. या दृष्टीने मूल्यवर्धनमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केंद्रस्थानी आहेत. या जोडीला आतापर्यंत राज्याने अनुसरलेले मूल्यशिक्षणाचे धोरण, अंगिकारलेली मूल्ये आणि SCF २०२४ मधील अपेक्षा यांचा मागोवा घेऊन आणखी काही मूल्ये समाविष्ट केली आहेत. ती अशी: जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती आणि श्रमप्रतिष्ठा.
मूल्ये रुजविण्यासाठी विशिष्ट क्षमता विकास
NCF २०२३ मध्ये मूल्यशिक्षण हे सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास (SEED) या विकास क्षेत्राचा भाग आहे. या क्षेत्राचा शैक्षणिक उद्देश भावनिक बुद्धिमत्तेचा विकास असा आहे. त्यामध्ये स्वतःच्या भावना जाणणे, त्यांचे व्यवस्थापन करून सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देणे यांचा समावेश आहे. तसेच उत्पादक काम आणि सेवा याविषयी तसेच नैसर्गिक पर्यावरणाविषयी विधायक दृष्टीकोन जोपासणे अपेक्षित आहे.
मूल्यवर्धनमध्ये दृष्टिकोनाचा हा धागा कायम ठेऊन, इयत्ता पहिली ते आठवीसाठी सर्व मूल्यवर्धन उपक्रमांची गुंफण पुढील चार क्षमता पुंजांच्या भोवती केली आहे.
- स्व-जाणीव आणि स्व व्यवस्थापन
- जबाबदारीने निर्णय घेणे
- सुसंवादी नातेसंबंध
- पर्यावरणाची काळजी आणि इतरांच्या कल्याणासाठी योगदान.
हा सारा धोरणात्मक विचार आणि आचार CASEL या जागतिक संस्थेच्या सामाजिक आणि भावनिक विकास विषयक कामावर आधारित आहे.

ल्यवर्धन उपक्रम
शाळेत मूल्यांचे शिक्षण विविध शालेय विषय अध्यापनात गुंफण करून ‘एकात्मिक’ रीतीने दिले जाते. दैनंदिन परिपाठ, सहशालेय कार्यक्रम इत्यादी मधूनही मूल्यपेरणी होते.
विद्यार्थ्याने एखाद्या मूल्याचा मनापासून स्वीकार करण्यासाठी मूल्य-संस्कारामध्ये पुरेसे सातत्य, रंजकता आणि श्रेणीबद्धता असणे, विद्यार्थ्याने मूल्य आचरणात आणण्यासाठी त्याविषयी अधिक विचारप्रवृत्त होणे या गोष्टी कळीच्या आहेत. त्या डोळ्यासमोर ठेऊन मूल्यवर्धनमध्ये मूल्यशिक्षण कार्यपद्धती विकसित केली आहे. अनेक वर्षे शाळांमध्ये अंमलबजावणी करता करता, देश विदेशातील तज्ञ व्यक्ती आणि NCERT सारख्या संस्था यांच्याकडून परीक्षण करून घेत ही पद्धती परिष्कृत केली आहे.
मूल्यवर्धन कार्यकमात, निवडलेल्या मूल्यांची रुजवणूक करण्याचा खास हेतू डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक इयत्तेसाठी सुमारे चाळीस एक श्रेणीबद्ध उपक्रम तयार केलेले आहेत. या उपक्रमांची विभागणी वर उल्लेख केल्याप्रमाणे चार विभागात केलेली आहे. नेहमीच्या वेळापत्रकांत ३५/४० मिनिटांच्या तासिकेत किंवा गरजेप्रमाणे सलग दोन तासिका घेऊन उपक्रम आयोजित करता येतात.
उपक्रम घेताना वापरल्या जाणाऱ्या काही शिक्षणपद्धती पुढे दिल्या आहेत. त्यातून शिक्षण पद्धतीमधील अनेक शैक्षणिक तत्वांचा उलगडा होईल. तत्पूर्वी सर्व प्रथम एका नमुना उपक्रमाची झलक पाहूया.
उपक्रमाचे स्वरूप आणि आयोजन: एक नमुना
उपक्रम: रागावर नियंत्रण (इयत्ता चौथी, विभाग-स्व जाणीव)
मुलांनी वाचण्यासाठी एक परिच्छेद दिला आहे. त्याचा सारांश असा : रितेश कशावरूनही पटकन चिडणारा मुलगा आहे. त्याला राग आवरता येत नाही. त्याची बहीण शीतल, त्याला उपाय म्हणून रंगपेटी आणून देते आणि ‘राग आला की चित्र काढ आणि रंगव’ असे सांगते.
वर्गातील आयोजन
- मुलांच्या जोड्या केल्या जातात. मुले ‘वाचूया’ या कृतीत वरील परिच्छेद वाचतात आणि पुढील प्रश्नांवर विचार करतात: शीतलची सूचना योग्य आहे का? अजून कोणते उपाय करता येतील?
- काही जोड्या त्यांनी केलेला विचार सर्वांपुढे सांगतात. शिक्षक आणखी काही पद्धती सुचवितात.
- मुले या पुढची ‘विचार करूया’ ही कृती करतात. त्यात रागवल्यानंतर करता येतील अशा काही कृतींची यादी दिली आहे. त्यातील कोणत्या कृती योग्य किंवा अयोग्य आहेत याचा विचार मुले आधी व्यक्तिगतपणे करतात, नंतर त्यांच्या उत्तराविषयी जोडीदाराबरोबर चर्चा करतात.
- काही जोड्या त्यांची उत्तरे सर्वांच्या समोर सादर करतात. इतर मुले त्यांच्याशी सहमत आहे की नाहीत ते कारणासह सांगतात.
- शिक्षक मुलांबरोबर चर्चा करतात: आपल्याला रागावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवता येणे का महत्त्वाचे आहे?
- शेवटी शिक्षक मुलांनी घरी गेल्यावर मोठ्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे? हे विचारायला सांगतात.
उपक्रमांतील शैक्षणिक पद्धती
- सहयोगी अध्ययन (cooperative learning) उपक्रमात नेहमी वापरली जाणारी ही एक बहुगुणी अनुभवसिद्ध शिक्षणपद्धती आहे. जोडीचर्चा किंवा गटचर्चा या सहयोगी रचना, हा बहुतेक उपक्रमाचा भाग आहे. लहान गटात मुले आपोआप दडपणमुक्त, बोलकी होतात. त्यांची नैसर्गिक अभिव्यक्ती फुलते. ती ‘अवघड’ वाटणाऱ्या प्रश्नांवरही एकट्याने आणि एकत्र विचार करतात. उपक्रमानुसार चित्रे काढतात, गप्पा मारतात, चर्चा करतात. भूमिका-अभिनय करतात, आपले मत हिरीरीने मांडतात. निश्चित उत्तर नसणाऱ्या विविध मुक्तोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुले आपले अनुभव आठवून, कल्पकता वापरून शोधतात. सर्वांच्या समोर आपला विचार मांडतात. सामूहिकपणे निर्णय घेतात. या प्रकारे सहयोगी रचना वापरून संविधानातील लोकशाही मूल्ये आपसूकपणे जोपासली जातात.
यालाच पूरक असणारे, वर्गात आणि बाहेर खेळता येणारे ‘सहयोगी खेळ’ मुले खेळतात. ते खेळताना मुलांनाच काय, शिक्षकांनाही धमाल येते. बरोबरीने खोलवर ठसा उमटवणारे मूल्यसंस्कारही मिळतात.

- वर्ग व्यवस्थापन: उपक्रमातील एकूणच व्यवस्थापन बालस्नेही, गुंतवून ठेवणारे, आनंद देणारे असते. शिक्षकांच्या स्नेहपूर्ण बोलण्यातून आणि वागण्यातून मुलांचा आत्मसन्मान जपला जातो. सहयोगी शिक्षण, एकत्र चर्चा यातून प्रत्येकाला सहभागाची संधी मिळते. प्रत्येकाला तारतम्याने यथायोग्य कौतुक आणि शाबासकी मिळते. शिकण्यातली उमेद टवटवीत राहील अशी काळजी घेतली जाते. मुलांनीच तयार केलेले वर्ग नियम आणि मुलांचे लक्ष आवाज न वाढवता, न बोलता शांतपणे वेधून घेण्याचे शांतता संकेत ही व्यवस्थापन तंत्रे शिक्षकप्रिय आहेत.
- घरी करायच्या कृती: वर्गात उपक्रमातून झालेले मूल्यसंस्कार घरातल्या अनौपचारिक शाळेत अधिक दृढ होण्यासाठी, योग्य त्या ठिकाणी, घरी करावयाच्या रंजक आणि अर्थपूर्ण कृती दिल्या जातात. त्यात मुलांचा घरी, शेजारी आणि इतरत्र अनेकांशी संवाद होतो. उदाहरणार्थ विद्यार्थी मुलाखती घेतात, परिसरातल्या सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांचा शोध घेतात. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक, सामाजिक घटक यांच्यामधले परस्पर नातेसंबंध अधिक स्नेहपूर्ण व दृढ होऊन त्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक समृध्द होत जातात.
- शिक्षकांची भूमिका: ज्ञानरचनावादी अशा या शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना शिक्षक हे मुक्त, समावेशक वातावरण राखून मुलांची विचार प्रक्रिया आणि कृती सुरळीत व अर्थपूर्ण रीतीने सुरू राहतील याची खातरजमा करतात. या प्रकारे मुख्यतः सुलभकाची (facilitator) भूमिका पार पडतात.
मूल्यवर्धनमधील विद्यार्थी मूल्यांकन
पुस्तिकेच्या सुरुवातीलाच दहा मूल्ये, त्यांच्याशी संबधित चार क्षमता, त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि शेवटी त्यानुसार अध्ययन निष्पत्ती यांचा समावेश केलेली सारणी दिलेली आहे. या सारणीवर आधारित निदेशकांच्या आधारे प्रत्येक सत्राअखेर एकदा याप्रमाणे वर्षातून दोनदा मूल्यांकन होते. त्यात विद्यार्थी स्वयंमूल्यांकन, जोडीदाराकडून सहाध्यायी मूल्यांकन आणि शिक्षक मूल्यांकन यांचा समावेश असतो. या निमित्ताने केलेल्या गुणात्मक / शाब्दिक नोंदी करताना शिक्षकांना सामाजिक भावनिक विकास या आव्हानात्मक क्षेत्रातील मूल्यांकन करण्याची दिशा मिळते तसेच समग्र प्रगतीपत्रकात या क्षेत्रासंदर्भातील मूल्यांकन करण्यासाठी मदत होते.
मूल्यवर्धनमधील शिक्षक प्रशिक्षण
मूल्यवर्धन उपक्रम घेण्यासाठी शिक्षकांनी उत्तम सुलभक होऊन स्वयंशिक्षण आणि स्वयंमूल्यमापनाला चालना देणे, सहयोगी शिक्षणाचा प्रभावी वापर, मुक्तोत्तरी प्रश्न विचारून त्यावरील चर्चा इष्ट दिशेला वळवता येणे, अशा काही कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे असते.
हे साध्य करण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षणात तात्विक चर्चेला प्रात्यक्षिक सरावाची प्रभावी जोड दिली जाते. प्रथम उपक्रम पुस्तिका, पीपीटी आणि व्हीडीओ या आधारे उपक्रमाचे विविध पैलू समजून घेतल्यावर शिक्षक आपापल्या गटात उपक्रम घेण्याची रंगीत तालीम करतात. त्यावेळी लहान विद्यार्थी, शिक्षक आणि उपक्रम निरीक्षक अशा तीनही भूमिकांचा अनुभव घेतात. सहयोगी खेळात मुलांसारखे रमून जातात. यातून त्यांना हे उपक्रम वर्गात घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
हा प्रशिक्षण वर्ग तीन ते चार दिवसांचा असतो. नंतर गरजेप्रमाणे एक/दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण, ऑनलाइन प्रशिक्षण, वर्ग निरीक्षण आणि त्यावर चर्चा, शिक्षण परिषदेत चर्चा इत्यादी प्रकारे शिक्षकांशी संवाद साधून वर्गात अपेक्षित कार्यवाही होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

ल्यवर्धनच्या नवीन पर्वातील उल्लेखनीय गोष्टी
नवीन मूल्यवर्धन पर्वात राज्यात झालेली कार्यवाही उल्लेखनीय आहे. राज्यातील एससीइआरटीमार्फत नियुक्त केलेल्या तज्ञगटाने इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांतील प्रत्येकी आठ विद्यार्थी उपक्रम पुस्तिका, आठ शिक्षक उपक्रम पुस्तिका, संबंधित व्हिडिओज यांचे सखोल परीक्षण करून मान्यता दिली. साहित्याचे मुद्रण आणि वितरण केले. त्या आधारे बहुस्तरीय राज्यव्यापी प्रशिक्षण आयोजित करून २,६५,५२२ शिक्षकांना प्रशिक्षित केले. यातून हा कार्यक्रम सुमारे ८७ हजार शाळा आणि ९७ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका: बहुरंगी बहिरंग आणि अंतरंग
या कार्यक्रमाच्या प्रभावी संनियंत्रणासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि मुथ्था फाउंडेशन यांनी नियुक्त केलेले तालुका-समन्वयक यांनी नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ४८,१५७ शाळांमध्ये भेटी देऊन विहित प्रपत्राआधारे ५८,६०० वर्ग-निरीक्षणे पूर्ण केली व शिक्षकवर्गाशी विधायक संवाद साधला. या निरीक्षणातून वर्गामध्ये सहयोगी वर्गरचनांचा अवलंब वाढला, मुलांचे चिकित्सक विचार आणि दृष्टिकोनातील विविधता यात वाढ झाली, शिक्षकांचा बोलण्याचा कालावधी मर्यादित झाला, मुलांची स्वतंत्र अभिव्यक्ती वाढली, इत्यादी उत्साहवर्धक बदल दिसून आले.
मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण शिक्षण प्रक्रिया आणि यंत्रणेचा अविभाज्य भाग होण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून एससीआरटीने विविध पर्यायातून आठवडी वेळापत्रकात दोन मूल्यवर्धन तासिकांचा समावेश करण्याविषयी पत्र निर्गमित केले.
या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा दीर्घकालीन मूल्यांकन अभ्यास करण्याचे नियोजन झाले आहे. तसेच या कार्यक्रमात स्वीकारलेली मूल्ये एकात्मिक पद्धतीने, सुरळीतपणे आणि प्रभावीपणे रुजविण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती निश्चित करून त्यानुसार पुढील टप्प्यात शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संविधानातील मूल्यांचा एवढा व्यापक जागर करणारे महाराष्ट्र हे देशातील सध्या एकमेव राज्य आहे. मूल्यशिक्षणाच्या या एक प्रकारच्या सामाजिक चळवळीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली हे या संस्थेचे भाग्यच आहे. शासन आणि एससीईआरटीचे अथक पाठबळ आणि प्रयत्न यामध्ये मनःपूर्वक सहयोग देऊन मूल्यशिक्षण अधिकाधिक सकस आणि सरस करण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी वर्ग आणि शिक्षक यांच्यासोबत राहून ही संस्था यथाशक्ती सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सौजन्य
जीवन शिक्षण मासिक (ऑगस्ट, २०२६)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे