शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारी एक प्रेरणादायी कहाणी पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी येथे पाहायला मिळते. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक बदलाचे हे उदाहरण मार्गदर्शक ठरते.
पांढरकवडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वांजरी (केंद्र – आकोली बु., जिल्हा – यवतमाळ) ही शाळा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात वसलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असून काही भाग अत्यंत मागास व आदिवासी बहुल आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ही शाळा तालुक्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असून संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
या शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत एकूण १४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ६० मुले आणि ८० मुलींचा समावेश आहे.
प्रारंभिक निरीक्षण
सप्टेंबर २०२५ मध्ये मेघा गटलेवार मॅडम यांची या शाळेत बदली झाली. त्यांना इयत्ता ७ वी व ८ वी चे वर्ग अध्यापनासाठी मिळाले. काही दिवसांतच त्यांनी लक्षात घेतले की, या आदिवासी व मागास भागातील विद्यार्थ्यांचे पालक बहुतांश मजुरी करणारे आहेत. त्यामुळे त्यांना मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्याचा परिणाम त्यांना जाणवत होता.
मुलांचे वर्तन कसे होते असे त्यांना विचारले असता मेघा मॅडम म्हणाल्या, “याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर तर होताच, त्याचबरोबर त्यांच्या वर्तणुकीवरही दिसून येत होता. विद्यार्थ्यांची उपस्थिती अनियमित होती, शाळेत उशिरा येणे, मधल्या सुट्टीत गोंधळ करणे, एकमेकांच्या खोड्या काढणे अशा समस्या जाणवत होत्या. वर्गात प्रवेश करताना चपला-बूट अस्ताव्यस्त राहायचे आणि वर्गात कचरा पडलेला दिसायचा. मोठ्या इयत्तेतील विद्यार्थी असल्याने केवळ सक्ती करून शिस्त लावणे प्रभावी ठरत नव्हते.”
मूल्यवर्धन उपक्रमांची सुरुवात
मेघा मॅडम पुढे सांगू लागल्या, “याच कालावधीत माझी मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी DRG म्हणून निवड झाली. मी प्रशिक्षण पूर्ण केले. तालुका स्तरावरील शिक्षक प्रशिक्षणातही सक्रिय भूमिका बजावली. प्रशिक्षणानंतर शाळेत सर्व शिक्षकांची बैठक घेतली व मूल्यवर्धन उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तिका अद्याप उपलब्ध नसल्या तरी, “पुस्तके येतील तेव्हा येतील; आपण उपक्रम लगेच सुरू करावेत” असा निर्धार शाळेतील सर्वांनी केला आणि उपक्रम घेणे सुरू केले.”
वर्गातील नियमनिर्मिती व अंमलबजावणी
या लोकशाही पद्धतीने वर्गनियम तयार केले. सर्व नियम मेघा मॅडम यांनी फळ्यावर लिहिले. विद्यार्थ्यांच्या सहमतीने ५ ते ६ महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे नियम मोडल्यास त्याचे परिणामही विद्यार्थ्यांच्या सहभागातून ठरविण्यात आले. हे नियम व परिणाम एका चार्टवर लिहून वर्गात लावण्यात आले. ‘शांतता संकेत’ हा उपक्रमही नियमितपणे राबविण्यात आला.
मेघा मॅडम पुढे म्हणाल्या, “हळूहळू या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. विद्यार्थी नियमांचे पालन करू लागले. एखादा विद्यार्थी नियम मोडल्यास इतर विद्यार्थी त्याला सौम्यपणे नियमांची आठवण करून देऊ लागले. नियम भंग झाल्यास दिलेली कार्येही विद्यार्थी आनंदाने पूर्ण करू लागले. उदा. पाढे म्हणणे, गतीने क्रियाकलाप करणे किंवा झाडांना पाणी देणे.”
मेघा मॅडम म्हणाल्या, “झाडांना पाणी देणे हे आता केवळ परिणाम राहिले नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी सवय बनली आहे. यामुळे वर्गातील मुले शिस्तीने वागू लागली. वर्गातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले, गोंधळ कमी झाला आणि विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढली.” पुढे त्या म्हणाल्या, “जर हे उपक्रम प्रत्येक धड्यानंतर कृती स्वरूपात पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले गेले, तर मूल्यवर्धन हा शिक्षणाचा अविभाज्य भाग बनेल.”
नियमित उपक्रम व व्यक्तिमत्त्व विकास
शाळेमध्ये आठवड्यातून दोन तासिका या उपक्रमांसाठी नियोजित करण्यात आल्या. यामध्ये ‘माझे छंद’, ‘नियमांचे महत्त्व’, ‘आपल्या विविध भावना’, ‘तणावमुक्तीची तंत्रे’ आणि ‘दादागिरीचा सामना’ यांसारख्या उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना घरी करण्यासाठीही विविध कृती दिल्या जात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव वाढू लागली. शिक्षक–विद्यार्थी संबंध अधिक मैत्रीपूर्ण झाले असून याचा सकारात्मक परिणाम उपस्थितीवरही झाला आहे.
पालकांचा प्रतिसाद
शाळेत आयोजित पालक मेळाव्यात पालकांनी आश्चर्य व्यक्त केले. “आमची मुले घरी खूप चांगले वागू लागली आहेत. तुम्ही मुलांवर अशी काय जादू केलीा?” अशी पालकांची प्रतिक्रिया त्यांनी सांगितली.
एक-दोन पालकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, पूर्वी मोबाईल व गेममध्ये मुले गुंतलेली असत. आता घरातील कामांमध्ये मदत करू लागली आहेत. अभ्यासासाठी मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर होत आहे. मुले पालक, मित्र व शेजाऱ्यांशी संवाद साधू लागली आहेत. तसेच आजी-आजोबांची काळजी घेणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे.
या केसस्टडीतून स्पष्ट होते की, शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून ते विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे साधन आहे. मूल्यवर्धन उपक्रमांनी केवळ वर्गातील शिस्त सुधारली नाही, तर विद्यार्थ्यांच्या वर्तनात, विचारसरणीत आणि जबाबदारीच्या जाणीवेतही सकारात्मक बदल घडवला. अशा उपक्रमांमुळे शाळा ही केवळ शिकण्याची जागा न राहता संस्कार घडविणारी जीवनशाळा बनते.