अबोल विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बदलाची कथा

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण दडलेले असतात. मात्र भीती, संकोच, आत्मविश्वासाचा अभाव किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील वातावरण, शिक्षकांचे प्रोत्साहन आणि मूल्याधिष्ठित उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम ठरत असून त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला चालना देतात. सदर केस स्टडीमध्ये एका अबोल, भीतीग्रस्त आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेने ग्रासलेल्या विद्यार्थ्यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून घडून आलेल्या सकारात्मक परिवर्तनाचा अभ्यास करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील उमरदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून येथे एकूण ३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून वर्गशिक्षक DRG शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

समस्येची तीव्रता 

या शाळेत सात्विक राजेंद्र गोरे (नाव बदललेले आहे.) हा विद्यार्थी इयत्ता तिसरी-चौथीच्या संयुक्त वर्गात शिक्षण घेत आहे. या वर्गात एकूण १७ विद्यार्थी आहेत. सात्विक हा स्वभावाने अत्यंत अबोल व संकोची होता. शाळेत आल्यानंतर तो नेहमी वर्गाच्या मागील बाकावर बसत असे. तो कोणाशीही संवाद साधत नसे तसेच इतर विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्याचे टाळत असे. वर्गातील चर्चांमध्ये किंवा उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास तो घाबरत असे.

त्याच्या या अबोल स्वभावामुळे त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासावर परिणाम होत होता. शिक्षकांनी त्याला बोलके करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र अपेक्षित बदल दिसून येत नव्हता. त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन पालकांशी संवाद साधला आणि त्याच्या अबोलपणामागील कारणांचा शोध घेतला.

आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न 

सात्विकला मोठ्या गटामध्ये बोलणे अवघड जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने आत्मविश्वास वाढविण्याचे नियोजन केले. सुरुवातीला त्याला जोडी चर्चेमध्ये सहभागी करून संवादासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यानंतर लहान गटांमध्ये चर्चा करण्याची संधी देण्यात आली. गटामध्ये काम करताना त्याला स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळू लागली आणि त्याची भीती कमी होऊ लागली.

पुढील टप्प्यात त्याला वर्गात सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे, छोटे अनुभव सांगणे आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी देण्यात आल्या. त्याने केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचे शिक्षकांनी मनापासून कौतुक केले. या सकारात्मक प्रोत्साहनामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.

मूल्यवर्धन उपक्रमांतील कथा, चर्चा, सहयोगी खेळ आणि विविध कृतींमुळे तो हळूहळू वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागला. पालकांनाही योग्य मार्गदर्शन करण्यात आले. घरी मुलाशी अधिक संवाद साधणे, त्याला व्यक्त होण्यासाठी संधी देणे आणि त्याच्या छोट्या यशाचे कौतुक करणे यासाठी पालकांचे सहकार्य घेण्यात आले.

प्रयत्नांना आले यश 

मूल्यवर्धन उपक्रमांच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे सात्विकमध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसून आला. वर्गशिक्षक श्री. किशोर नरमिटवार म्हणाले, “पूर्वी अबोल, भीतीग्रस्त आणि एकलकोंडा असलेला सात्विक आता आत्मविश्वासाने बोलू लागला आहे. तो वर्गातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतो, शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतो आणि आपले विचार स्पष्टपणे मांडतो. त्याच्या वाचन व लेखन कौशल्यांमध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. तो इतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाने मिसळू लागला असून सहकार्याने काम करण्याची सवय त्याच्यामध्ये विकसित झाली आहे. त्याच्या सामाजिक कौशल्यांमध्ये वाढ झाली असून मित्रपरिवारही वाढला आहे.”

मूल्यवर्धन उपक्रमादरम्यान वर्गशिक्षक श्री. किशोर नरमिटवार आणि विद्यार्थी सात्विक गोरे

पालकांची प्रतिक्रिया

पालक श्री. राजेंद्र गोरे म्हणाले, “आता माझा मुलगा सात्विक आनंदाने शाळेत जातो. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला आहे. यापूर्वी तो घरीही फारसा कोणाशी बोलत नव्हता. गावातील इतर मुलांमध्येही तो मिसळत नव्हता. परंतु शाळेत सुरू असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांमुळे आणि विविध कृतींमुळे त्याच्या वागण्यात बदल झाला आहे. पूर्वी गावात त्याला ‘मुक्या’ या नावाने ओळखले जात होते; परंतु आता त्याचे मित्र आणि गावकरी त्याला ‘बोलक्या’ म्हणून बोलतात. माझ्या मुलामध्ये झालेला बदल पाहून मला खूप आनंद वाटतो. या उपक्रमामुळे त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.”

मुख्याध्यापकांचे मनोगत

मुख्याध्यापक श्री. बालाजी राखेवार यांनी सांगितले, “मूल्यवर्धन उपक्रमांमुळे केवळ सात्विकमध्येच नव्हे तर इतर विद्यार्थ्यांमध्येही सकारात्मक बदल दिसून आला आहे. विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारले आहे, शाळेतील उपस्थिती वाढली आहे आणि अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी झाली आहे.”

समारोप

सात्विकचा ‘अबोल ते आत्मविश्वासपूर्ण आणि बोलका विद्यार्थी’ हा प्रवास मूल्यवर्धन उपक्रमांच्या परिणामकारकतेची साक्ष देणारा आहे. योग्य वेळी मिळालेले प्रोत्साहन, शिक्षकांचा संवेदनशील दृष्टिकोन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांमुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिवर्तन घडून आले.

Share the Post:

Recent Blogs