मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड या दोन्ही उपक्रमांचे ध्येय एकच… मुलांमध्ये मूल्यांची रुजवण आणि त्यांना जबाबदार, संवेदनशील नागरिक बनवणे. भोर तालुक्यात या दोन्ही उपक्रमांना एकत्र आणत झालेल्या विचारमंथनाविषयी जाणून घेऊया श्री. विद्याधर शुक्ल, उपसंचालक (सेवानिवृत्त), SCERT महाराष्ट्र, पुणे आणि सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या विचारातून.
मूल्यवर्धन आणि स्काऊट-गाईड : समान ध्येय, एकत्रित विचार
बालवयापासून व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्यांचा परिपोष होऊन विद्यार्थी हा उद्याचा विविध क्षमतांनी सुसज्ज असणारा समाजाभिमुख नागरिक घडावा, हे मूल्यवर्धन आणि स्काऊट गाईड या दोन्ही कार्यक्रमातील समान ध्येय आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी या दोन्ही कार्यक्रमांचे प्रतिनिधी एकाच मंचावर येण्याचा योग भोर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. सचिन लोखंडे साहेब यांनी घडवून आणला. त्यांच्या अध्यक्षतेखाली श्री. शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नसरापूर येथे संपन्न झालेल्या स्काऊट गाईड कार्यक्रमाच्या वार्षिक नियोजन बैठकीच्या मंचावर, मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रतिनिधींनाही मूल्यांच्या संवर्धनाविषयी सह-विचारमंथन करण्याची संधी मिळाली.
स्काऊट-गाईडमधून मूल्यशिक्षणाचा पाया
या कार्यक्रमासाठी मा. लोखंडे साहेब यांच्या समवेत कॉलेजचे प्राचार्य श्री. एस. एच. शेख सर, स्काऊट गाईडचे जिल्हा समन्वयक श्री. दिगंबर करंडे सर व त्यांचे सहकारी, मूल्यवर्धन कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेतील शैक्षणिक सल्लागार श्री. विद्याधर शुक्ल, आशय निर्मिती विभागाचे श्री. बाबाजी म्हस्के सर, मुख्य प्रशिक्षक श्री. सूरज गोहेल तसेच भोर तालुक्यामधील सर्व विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित व्यक्ती उपस्थित होत्या.
श्री. करंडे सर यांनी स्काऊट-गाईड कार्यक्रम व त्यातील मूल्ये याविषयीची पार्श्वभूमी विशद करून त्यातील योगदानाबद्दल प्रशासन व सहकाऱ्यांचे आभार मानले.
मूल्यवर्धनमधून सामाजिक-भावनिक अध्ययनाला चालना
यानंतर श्री. विद्याधर शुक्ल यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रयोगशील विकसनाचा मागोवा घेतला. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाच्या पाठबळाने मूल्यवर्धन कार्यक्रमातून नवीन शैक्षणिक धोरणामधील सामाजिक-भावनिक अध्ययन क्षेत्राविषयी मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सक्रिय जागरूकता वाढविण्याचे काम कसे होते, यावर प्रकाश टाकला. भोर तालुक्यामध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक दृष्टिकोन असणारे प्रशासक श्री. सचिन लोखंडे, सर्व विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या हार्दिक योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रभावी पर्यवेक्षणासाठी शाळाभेटीत मूल्यशिक्षणाविषयी शिक्षकांशी अनौपचारिक संवाद साधणे, अंमलबजावणीविषयी शेरे पुस्तकात अभिप्राय देणे यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. शालेय विषय शिकवताना ‘मूल्यवर्धन’मधील सहयोगी अध्ययनासारख्या शिक्षण पद्धतींचा वापर सुरू करण्याविषयी त्यांनी आवाहनही केले.
मूल्यसंवर्धनासाठी प्रशासनाचे पाठबळ
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सचिन लोखंडे यांनी मूल्यवर्धन आणि स्काऊट गाईड या दोन्हींचाही हेतू मूल्यांचे संवर्धन हाच आहे, असे प्रतिपादन केले. आतापर्यंत मूल्यसंस्कार देणाऱ्या कुटुंबसंस्थेचा संकोच होत असल्याने मूल्यवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या दृष्टीने मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका, पाठपुरावा करण्यासाठी तालुक्यातील प्रशासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमधील मनुष्यबळ यामुळे मूल्यविकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दोन्ही कार्यक्रमांना प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शाळाभेटीतून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा
या बैठकीनंतर फाऊंडेशनचे प्रतिनिधी यांनी केंद्रप्रमुख श्री. बोरसे आणि मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्री. प्रतीक जगताप व श्री. प्रशांत कांबळे यांच्यासह येवली केंद्रामधील जि.प.प्रा. शाळा संगमनेर व केंद्रशाळा येवली या शाळांमध्ये वर्गनिरीक्षण करून शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी विविध प्रासंगिक अडचणींवर मात करून मूल्यवर्धन कार्यक्रम पुढे नेणाऱ्या शाळा, शिक्षक आणि प्रशासनाच्या सकारात्मक पाठबळाचा प्रत्यय आला. स्थानिक प्रसारमाध्यमांनीही या भेटीची आवर्जून दखल घेतली.