सहयोगी अध्ययनातून विद्यार्थ्यांचा वाढला आत्मविश्वास; एकमेकांकडून शिकण्याची लागली सवय

वर्गातील प्रत्येक विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावा, त्याने स्वतःचे विचार मांडावेत आणि एकमेकांकडून शिकावे, यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांच्या व्यक्त होण्याच्या क्षमतेत आणि आत्मविश्वासात सकारात्मक बदल घडू शकतो. स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर, नाशिक येथील शिक्षक श्री. योगेश पुंडलिकराव कड यांनी सहयोगी अध्ययन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये असाच सकारात्मक बदल घडवून आणला.

एका बातमीने दिली नव्या प्रयोगाची दिशा

स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर, नाशिक या शाळेतील शिक्षक श्री. योगेश पुंडलिकराव कड (SRG) हे पाचवीचे वर्गशिक्षक आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. यामध्ये श्री. योगेश नेहमीच पुढाकार घेत असतात.

त्यांनी दररोज शिकवण्यापूर्वी वर्तमानपत्र वाचून घेण्याची एक चांगली सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवली होती. एक दिवस त्यांनी दैनिक ‘सकाळ’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील (online) “वर्गातील मुले शिकणार एकमेकांकडून, समान आवड असलेल्या विद्यार्थ्यांचे होणार समूह!” ही बातमी विद्यार्थ्यांकडून वाचून घेतली. बातमी ऐकताच विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिली, “सर, करा ना मग लगेच गट… द्या ना विषय…!”

दैनिक ‘सकाळ’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील बातमी

श्री. योगेश यांच्या निरीक्षणानुसार, अनेक विद्यार्थी विचारल्याशिवाय स्वतःहून बोलत नाहीत. काही विद्यार्थी अभ्यासात चांगले असले तरी त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्यास संकोच वाटतो. विद्यार्थ्यांमध्ये गटचर्चेची सवय आणि आत्मविश्वास कमी असल्याचे जाणवले.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये गटचर्चेची सवय निर्माण करणे, विचार मांडण्याची क्षमता वाढवणे, आत्मविश्वास विकसित करणे आणि चांगल्या सवयींबाबत विद्यार्थ्यांना स्वतः विचार करायला प्रवृत्त करणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.

मूल्यवर्धन प्रशिक्षणातून मिळाली प्रेरणा

त्याच वेळी मूल्यवर्धनचे SRG प्रशिक्षण पूर्ण झाले होते आणि त्यामध्ये सहयोगी अध्ययन हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यात आला होता. याच उत्साहाचा लाभ घेत श्री. योगेश यांनी मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतील “वैयक्तिक जबाबदाऱ्या” या घटकातील ‘अभ्यासाच्या सवयी’ हा विषय विद्यार्थ्यांना दिला.

त्या वेळी शाळेत पुस्तिका उपलब्ध नसल्यामुळे संबंधित उपक्रम निवडून विद्यार्थ्यांना त्याचे झेरॉक्स देऊन उपक्रम घेण्याचे ठरवले.

योग्य पूर्वतयारी आणि गटचर्चेची सुरुवात

उपक्रम राबविण्यापूर्वी योग्य पूर्वतयारी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले, प्रत्येक गटासाठी एक गटनायक निवडण्यात आला आणि गटनायकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या.

यासोबतच चर्चेसाठी आवश्यक वेळ, नियम आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली. सुरुवातीला काही गटांमध्ये थोडा गोंधळ दिसून आला आणि काही विद्यार्थी विषयापासून भरकटत होते. मात्र गटनायकांनी पुढाकार घेऊन सर्वांचे लक्ष पुन्हा विषयाकडे केंद्रित केले. गटातील कार्य पूर्ण झाले.

एका उपक्रमातून लागली सहअध्ययनाची सवय

यानंतर ही कृती एका उपक्रमापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना याची सवय लागली आणि ते प्रत्येक उपक्रमात अशाच प्रकारे सहभागी होऊ लागले.

कधी जोडी चर्चा, तर कधी गटचर्चा अशा पद्धतींनी विद्यार्थी एकमेकांसोबत चर्चा करू लागले आणि आपले मत मांडू लागले. प्रत्येक गटाने किंवा जोडीने चर्चेनंतर तयार केलेले मुद्दे संपूर्ण वर्गासमोर मांडण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू झाली.

शांत आणि अबोल विद्यार्थ्यांचाही वाढला सहभाग

मूल्यवर्धन उपक्रमांमुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले. काही दिवसांनंतर आठवड्यातून दोनदा मूल्यवर्धन तासिका नियमितपणे घेण्यास सुरुवात झाली.

शांत व अबोल विद्यार्थी देखील चर्चेत सक्रियपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी पुस्तकातील मुद्द्यांपेक्षा वेगळे आणि नाविन्यपूर्ण विचार मांडले आणि सहअध्ययनाची भावना निर्माण झाली.

या अनुभवातून हे स्पष्ट झाले की, विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा त्यांना स्वतः विचार करण्याची आणि व्यक्त होण्याची संधी दिल्यास ते अधिक प्रभावीपणे शिकतात.

शांत बसणारी व कमी बोलणारी मुले देखील गटामध्ये उत्साहाने सहभागी झाली आणि ‘विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिल्यास ते स्वतः शिकू शकतात’ ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवता आली.

विद्यार्थ्यांना आवडला गटातून शिकण्याचा अनुभव

विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की “आम्हाला असे गटात शिकायला खूप आवडते”, “आम्ही मित्रांकडून नवीन गोष्टी शिकलो” आणि “आम्हाला पुन्हा असे उपक्रम हवेत.”

शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून समाधान व्यक्त केले.

सहयोगी अध्ययनातून घडलेला सकारात्मक बदल

सहयोगी अध्ययनाच्या या प्रयोगातून हे स्पष्ट झाले की, वर्गातील प्रत्येक विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असते ती योग्य संधी, विश्वासाचे वातावरण आणि व्यक्त होण्यासाठी मोकळीक.

मूल्यवर्धन उपक्रमातून मिळालेल्या प्रेरणेचा वर्गातील गरजेशी मेळ घालत श्री. योगेश कड यांनी केलेला हा छोटासा प्रयोग विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरला.

एकत्र शिकताना विद्यार्थी केवळ विषय समजून घेत नाहीत; ते एकमेकांना ऐकायला, विचार करायला, आपले मत मांडायला आणि सहकार्याने पुढे जायला शिकतात.

याच प्रक्रियेतून वर्गखोली केवळ शिकवण्याची जागा न राहता विचारांची, संवादाची आणि आत्मविश्वासाची जागा बनते, हे निश्चित!

Share the Post:

Recent Blogs