एखादा शिक्षक वर्गात नसताना पहिली ते सातवीची मुले शांत बसून स्वतःहून अभ्यास करू शकतात? वर्गातील कचरा उचलण्यापासून ते चपला रांगेत ठेवण्यापर्यंतची कामं मुलं स्वतःच्या मर्जीने करू शकतात? बहुतेकांचं उत्तर ‘नाही’ असंच असेल; पण, रत्नगिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आरवली नं. १ मधील मुलांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. शिक्षकांनी न ओरडता, कोणतीही कडक शिक्षा न देता मुलांमध्ये हा सकारात्मक बदल घडवून आणलाय. हा बदल कसा झाला? चला, जाणून घेऊया.

जिल्हा परिषद शाळा, आरवली नं. १, ता. संगमेश्वर, जि. रत्नगिरी
वर्गात शिक्षक नसले की गोंधळ… ही समस्या बदलली कशी?
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेली जिल्हा परिषद शाळा, आरवली नं. १. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आणि सुमारे ८० विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली ही शाळा.
शाळेतील शिक्षकांवर अध्यापनासोबतच विविध प्रशासकीय आणि लिपिकीय कामांची जबाबदारीही असते. त्यामुळे काही वेळा आवश्यक कामासाठी शिक्षकांना वर्गाबाहेर जावे लागते. अशा वेळी वर्गात गोंधळ होणे, विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे आणि स्वयंशिस्तीचा अभाव जाणवणे, या समस्या शिक्षकांसमोर होत्या.
वर्गात शिस्त राखण्यासाठी वारंवार सूचना द्याव्या लागत होत्या. कचरा न करणे, वेळेवर शाळेत येणे, चपला व्यवस्थित ठेवणे यांसारख्या साध्या सवयींसाठीही विद्यार्थ्यांना सतत सांगावे लागत होते. विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारली, तर? हाच विचार या बदलाचा पाया ठरला.
मूल्यवर्धन प्रशिक्षणातून मिळाली नवी दिशा
नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळेतील पाच शिक्षकांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून प्रेरणा घेत शिक्षकांनी शाळेत मूल्यवर्धनविषयक उपक्रम सुरू केले.
सुरुवातीचे पाच दिवस परिपाठाच्या वेळी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांशी मूल्यवर्धनविषयी संवाद साधत होते. त्यानंतर दर आठवड्याला शनिवार आणि इतर दिवशीही ठरवून उपक्रम घेण्यास सुरुवात झाली. त्या वेळी विद्यार्थ्यांसाठीची उपक्रम पुस्तके उपलब्ध नसल्याने, पुस्तकांशिवाय घेता येतील अशा उपक्रमांवर भर देण्यात आला. याच प्रक्रियेत इयत्ता पाचवीचे शिक्षक श्री. अशोक जायभाये यांनी ‘वर्गनियम व परिणाम’ हा मूल्यवर्धन उपक्रम राबवण्याचे ठरवले.

मूल्यवर्धन उपक्रम घेताना शिक्षक श्री. अशोक जायभाये आणि इयत्ता पंचवीचे सहभागी विद्यार्थी
नियम शिक्षकांनी नाही, विद्यार्थ्यांनीच ठरवले!
सर्वप्रथम विद्यार्थ्यांसमोर वर्गात जाणवणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या, मुलांशी चर्चा झाली. यानंतर, “आपला वर्ग आनंदी, शिस्तबद्ध आणि अभ्यासासाठी पोषक बनवायचा असेल, तर आपण कोणते नियम पाळायला हवेत?” असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला.
मुलांनी विचार केला, आपापली मते मांडली आणि चर्चेतून लोकशाही पद्धतीने वर्गनियम तयार केले. शिक्षकांनी नियम लादण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच ते ठरवण्याची संधी दिली. एवढेच नव्हे, तर एखादा नियम मोडला गेल्यास त्याचे परिणाम काय असावेत, हेही मुलांनी एकत्रितपणे ठरवले. येथे परिणाम म्हणजे शिक्षा नव्हे, तर आपल्या कृतीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी करायची योग्य कृती. तयार झालेले नियम आणि परिणाम वर्गाच्या दर्शनी भागात लावण्यात आले.

विद्यार्थ्यांनी ठरवलेले वर्गनियम
सुरुवातीला शिक्षकांना नियमांची आठवण करून द्यावी लागत होती. हळूहळू मात्र चित्र बदलू लागले. मुलेच एकमेकांना नियमांची आठवण करून देऊ लागली. एखाद्या मित्राकडून नियम मोडला गेला, तर आधी त्याला समजावून सांगणे आणि तरीही नियमाचे उल्लंघन झाल्यास ठरवलेल्या परिणामानुसार कृती करणे, हे मुलांच्या सवयीचा भाग बनू लागले.
शिक्षकांनी सांगितले म्हणून नियम पाळण्यापेक्षा, आपणच ठरवलेले नियम पाळण्याची जबाबदारी मुलांनी स्वीकारली. हाच या उपक्रमातील महत्त्वाचा बदल होता.
गोंधळ कमी झाला; स्वयंशिस्त वाढली!
‘वर्गनियम व परिणाम’ हा उपक्रम राबवल्यानंतर इयत्ता पाचवीच्या वर्गात अनेक सकारात्मक बदल दिसू लागले.
१. शिक्षक नसतानाही अभ्यास सुरू!
शिक्षक वर्गात नसताना शांत बसणे आणि आपला अभ्यास करणे, हा नियम विद्यार्थ्यांनी स्वीकारला. आता शिक्षक काही वेळासाठी वर्गाबाहेर गेले, तरी मुले स्वतःहून अभ्यासात गुंतलेली दिसतात.
२. नियम पाळण्याची सवय!
वर्गात कचरा न करणे, चपला व्यवस्थित ठेवणे आणि वेळेचे पालन करणे यांसारख्या गोष्टींकडे मुले अधिक जबाबदारीने पाहू लागली. वर्गातील गोंधळ कमी झाला आणि शिस्त वाढली.
३. शिक्षकांचा ताण कमी; अध्यापनासाठी पोषक वातावरण!
वर्गात शिस्त राखण्यासाठी वारंवार ओरडण्याची किंवा सूचना देण्याची गरज कमी झाली. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येऊ लागले.
४. एका वर्गातील बदलाची संपूर्ण शाळेने घेतली दखल!
इयत्ता पाचवीत या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यानंतर शाळेतील इतर वर्गांमध्येही ‘वर्ग नियम व परिणाम’ यांचे तक्ते तयार करण्यात आले. एका वर्गातून सुरू झालेला बदल संपूर्ण शाळेत पोहोचू लागला.
दंगा करणारी मुलेही बदलू लागली!
श्री. अशोक जायभाये आवर्जून काही विद्यार्थ्यांचा उल्लेख करतात. पूर्वा येडगे, समर मांडवकर आणि ऋषिराज भोर या विद्यार्थ्यांविषयी वर्गात दंगा करणे, इतरांना त्रास देणे आणि अभ्यास न करणे अशा तक्रारी वारंवार येत असत.
मात्र, मूल्यवर्धनचे उपक्रम सुरू झाले आणि वर्गनियम ठरवण्यात या मुलांनीही सक्रिय सहभाग घेतला. नियम तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे म्हणणे ऐकले गेले. आपल्या वर्गात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात, हे ठरवताना त्यांनाही जबाबदारीची जाणीव झाली. हळूहळू त्यांच्या वर्तनात बदल दिसू लागला. नियम पाळण्याकडे त्यांचा कल वाढला आणि त्याचा परिणाम वर्गातील वातावरणावरही झाला. ज्या मुलांना वारंवार नियम सांगावे लागत होते, तीच मुले आता नियम पाळण्याच्या प्रक्रियेचा भाग बनली होती.
पालकांनाही जाणवला मुलांमधील बदल!
शाळा व्यवस्थापन समितीलाही (SMC) शाळेत सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती होती. पालकसभेत काही पालकांनी मुलांमधील बदलाबद्दल उत्सुकतेने विचारणा केली.
पूर्वीपेक्षा मुले स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवू लागली आहेत, अभ्यासाला बसू लागली आहेत आणि इतरांना त्रास देण्याचे प्रमाणही कमी झाले आहे, असे पालकांच्या लक्षात आले होते.
मुलांमध्ये हा बदल कसा घडला, याबद्दल पालकांनी शिक्षकांकडे विचारणा केली. तेव्हा श्री. जायभाये यांनी या बदलामागे मूल्यवर्धनच्या उपक्रमांचा, विशेषतः मुलांनी स्वतः तयार केलेल्या ‘वर्गनियम व परिणाम’ यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.

मूल्यवर्धन उपक्रमादरम्यानची काही क्षणचित्रे…
विद्यार्थ्यांना आवडला गटातून शिकण्याचा अनुभव
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की “आम्हाला असे गटात शिकायला खूप आवडते”, “आम्ही मित्रांकडून नवीन गोष्टी शिकलो” आणि “आम्हाला पुन्हा असे उपक्रम हवेत.”
शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून समाधान व्यक्त केले.
नियम पाळण्यापलीकडे… जबाबदार व्यक्तिमत्त्व घडवण्याकडे!
आरवली नं. १ शाळेतील हा अनुभव एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. वर्गातील शिस्त म्हणजे केवळ शांतता राखणे किंवा शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे नव्हे. विद्यार्थ्यांना विचार करण्याची, स्वतः निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची संधी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
‘वर्गनियम व परिणाम’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ नियम तयार केले नाहीत, तर इतरांचे म्हणणे ऐकणे, सामूहिक निर्णय घेणे, स्वतःच्या वर्तनाचा विचार करणे आणि आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे यांचाही अनुभव घेतला.
मूल्यवर्धनचे हेच तर उद्दिष्ट आहे की, मुलांना योग्य काय आणि अयोग्य काय, याचा विचार करून योग्य कृती निवडण्यासाठी सक्षम बनवणे. आरवली शाळेतील हा बदल वर्गातील शिस्तीपुरता मर्यादित नाही. तो विद्यार्थ्यांमध्ये रुजणाऱ्या स्वयंशिस्तीचा, जबाबदारीचा आणि मूल्याधिष्ठित वर्तनाचा अनुभव आहे.