मूल्यवर्धनाने बदलले वर्गातील नातेसंबंध

शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ती संवेदनशील माणूस घडवते. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ‘मूल्यवर्धन’ उपक्रमामुळे मुलांच्या मनात अशी काही आपुलकी रुजली, की त्यांनी एका अंध वर्गमैत्रिणीचे आयुष्यच बदलून टाकले. सहकार्य आणि आदर काय असतो, हे शिकवणारी ही एक अत्यंत प्रेरणादायी यशोगाथा…

मूल्यवर्धन: संस्कारांची नवी पाऊलवाट

शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून, संवेदनशीलता, सहकार्य आणि माणुसकीची जपणूक करणारे संस्कारकेंद्र असते. मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी आदर, आपुलकी आणि मदतीची भावना विकसित होत जाते. अशाच उपक्रमांमुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल आणि अंध विद्यार्थिनीला तिच्या दैनंदिन कामांमध्ये सहाध्यायांकडून स्वयंस्फूर्तीने मदत मिळू लागली. कोणत्याही अपेक्षेशिवाय दिली जाणारी ही मदत केवळ सहकार्य नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेल्या संवेदनशीलतेचे आणि मूल्यशिक्षणाच्या प्रभावाचे जिवंत उदाहरण होते.

जि. प. प्रा. शाळेतील संवेदनशील शिक्षकाचा प्रयत्न

महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील सर्व जिल्हापरिषद, स्वराज संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, भविष्यात लोकशाहीतील जबाबदार, संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक व्हावेत, हे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, स्व-जाणीव, वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी, नातेसंबंध या क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो.

सहशिक्षक श्री. अरुण शिंदे वर्गात मूल्यवर्धन उपक्रम घेताना…

बीड जिल्ह्यातील जि.प.प्रा.शाळा शिंदी (केंद्र-विडा, तालुका-केज) येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. अरुण शिंदे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरीय मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षक [SRG] म्हणून त्यांनी ऑगस्ट २०२६ पासून शाळेत नियमितपणे मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी श्री. शिंदे विविध उपक्रम, चर्चासत्रे, गटकार्य, आणि सर्जनशील कृतींचा वापर करतात.

त्यांच्या वर्गात अनुराधा गोरे (नाव बदलले आहे) ही अंध मुलगी शिक्षण घेत आहे. तिला बाहेर शिक्षणासाठी तिचे पालक पाठण्यासाठी तयार नव्हते. अनुराधाचे शिकणे अधिक सोपे व्हावे म्हणून शिक्षक शिंदे हे काही ब्रेल लिपी तंत्राचाही वापर करतात. स्वत: वर्गात उपस्थित असेपर्यंत अनुराधाला आवश्यक ती मदत ते करत; परंतु इतरवेळी मात्र ती एकटीच असे. बर्‍याचदा ती अबोल असे. मूल्यवर्धन उपक्रम सुरू करण्यापूर्वी तिला मदत करायला कोणी उत्सुक नसायचे.  

‘वर्गनियमातून’ रुजली मदतीची सवय

अरुण शिंदे म्हणाले, “मूल्यवर्धन उपक्रमांमुळे ही अवघड गोष्ट सोपी झाली. ऑगस्ट २०२५ मध्ये मुलांनी वर्गनियम तयार केले. ‘एकमेकांना मदत करूया’ असा एक महत्त्वाचा वर्गनियम सर्वांच्या सहमतीने ठरवला होता. या वर्गनियमाचा खूपदा फायदा असा झाला की, मुले अनुराधाला मदत करू लागली आणि पुढे त्यांना ही सवयच लागली.”   

भावनांची समज आणि बदललेले वातावरण

आणखी काही उपयोगी पडलेले उपक्रम सांगताना ते म्हणाले, “मी उदाहरण म्हणून सांगेल की ‘नैराश्याचा सामना’, ‘आपल्या विविधा भावना’, ‘अशाब्दिक संवाद’ या उपक्रमांची अधिक पूर्वतयारी करावी लागली. विद्यार्थ्यांशी अधिक चर्चा केली; पण यावेळी अनुराधाला न दुखवता माझा संदेश मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी तिला वर्गाबाहेर जाताना-येताना, रस्ता ओलाडतांना, शाळेचे मैदान या ठिकाणी मदत करू लागले. तिच्याशी संवाद करू लागले.

चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचे समाधान

अनुराधामध्ये झालेले बदल सांगताना ते म्हणतात, “तिचा शाळेतील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांशी संवाद वाढला. अलिकडे ती आंनदी वाटते. याबाबत इतर शिक्षकही तिच्या या बदलाबद्दल स्टाफ मीटिंगमध्ये बोलत असतात.” तिच्या पालकांच्या काही प्रतिक्रिया आल्या का असे विचारले असता त्यांनीं सांगितले, “पालक म्हणतात की शाळेत जाण्यासाठी ती उत्सुक असते. शाळेत घडलेल्या गोष्टीबद्दल ती मोकळेपणाने बोलत असते.”  

हसऱ्या चेहऱ्यांवर दिसतोय बदलाचा खरा आनंद!

शिक्षकाचा सकारात्मक दृष्टिकोन हीच गुरुकिल्ली

बहुतेकवेळा अशा संवेदनशील गोष्टींना कसे हाताळावे, याबाबत काही ठराविक अभ्यासक्रम किंवा तसा फ्लॅटफॉम मिळत नाही; परंतु मूल्यवर्धनमधील उपक्रम हे दैनंदिन जीवनाशी अधिक संबंधित असल्यामुळे अशा कल्पना सुचायला मदत होते. जर विद्यार्थ्यांना आपण संधी दिली आणि वैचारिक खाद्य पुरवले की, तेही त्या दिशेने विचार करू लागतात. फक्त आपला स्वत: शिक्षक म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक हवा.”

– सचिन वाळुंजकर

मास्टर ट्रेनर, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन