सहयोगी अध्ययनाचे मर्म आणि महत्त्व

वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संकल्पना सहज समजते, तर दुसऱ्याला ती समजून घेण्यासाठी थोडी मदत लागते. अशा वेळी पहिला विद्यार्थी आपल्या मित्राला तीच गोष्ट स्वतःच्या शब्दांत समजावून सांगतो. यातून केवळ एका विद्यार्थ्याचे शिकणे सोपे होत नाही, तर समजावून सांगणाऱ्या विद्यार्थ्याचेही आकलन अधिक पक्के होते. शिकण्याच्या याच परस्परपूरक प्रक्रियेला म्हणतात, ‘सहयोगी अध्ययन’ (Peer Learning)!

शिकण्याची नवी दिशा : शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे आणि विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांकडे!

मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांच्याकडून एकत्रित काम करून घेणे नव्हे; तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेणे होय. कोणाला एखादी संकल्पना चांगली समजली आहे, कोणाला मदतीची गरज आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याला आणखी मार्गदर्शन हवे आहे, हे शिक्षक ओळखतात. त्यानुसार विद्यार्थ्यांना एकमेकांकडून शिकण्याच्या संधी देतात.

यामध्ये शिक्षकाची भूमिका केवळ शिकवण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ते मार्गदर्शक आणि निरीक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याला योग्य दिशा देतात.

पाठांतर नव्हे, तर समजून घेण्यावर भर!

नोव्हेंबर २०२६ च्या ‘शिक्षण संक्रमण’ मासिकातील आपल्या लेखात गोंदियाच्या मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री. दामोदर धुवारे यांनी सहयोगी अध्ययनाचे महत्त्व काही सहजसुंदर उदाहरणांतून स्पष्ट केले आहे.

हिंदीतील ‘नाक में दम करना’ हा मुहावरा एका विद्यार्थ्याला समजतो; मात्र त्याच्या मित्राला त्याचा अर्थ माहीत नसतो. अशा वेळी तो विद्यार्थी स्वतःच्या भाषेत त्याचा अर्थ समजावून सांगतो आणि योग्य प्रसंगही सांगतो. मराठीतील ‘कौतुक’ या शब्दाचा अर्थ किंवा इंग्रजीतील ‘Brave’ या शब्दाचा अर्थ समजावताना देखील अशीच प्रक्रिया घडते. यातून विद्यार्थी केवळ शब्दाचा अर्थ लक्षात ठेवत नाहीत, तर त्याचा योग्य संदर्भात वापर करायलाही शिकतात.

धुवारे सरांनी अधोरेखित केलेला हा विचार महत्त्वाचा आहे : एखादी गोष्ट स्वतः समजून घेणे आणि ती दुसऱ्याला समजावून सांगता येणे, या दोन्ही शिकण्याच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. ‘उत्तर काय?’ यापेक्षा ‘असे का?’ आणि ‘याचा उपयोग कुठे होतो?’ हे प्रश्न विचारण्याची सवय लागते. म्हणजेच शिकणे केवळ परीक्षेपुरते न राहता जीवनाशी जोडले जाते.

मूल्यवर्धन : सहकार्याच्या अनुभवातून मूल्यांची रुजवणूक!

मूल्यवर्धन ३.० मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सक्रिय सहभाग आणि मूल्यांची रुजवणूक यांना महत्त्व दिले आहे. सहयोगी अध्ययनातून संवाद, सहकार्य, परस्पर आदर, आत्मविश्वास, नेतृत्व आणि जबाबदारी यांसारखी मूल्ये वर्गातील प्रत्यक्ष अनुभवांतून विकसित होतात. यात प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची, आपले विचार मांडण्याची आणि दुसऱ्याला मदत करण्याची संधी मिळते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील समजून घेणे, चिंतन, अनुभव आणि कृतीतून शिकणे या दृष्टिकोनालाही सहयोगी अध्ययन पूरक ठरते.

शिकताना सोबत, घडताना समृद्ध!

शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षेत योग्य उत्तरे लिहिणे नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करता येणे, स्वतःचे मत मांडता येणे आणि गरज पडल्यास दुसऱ्याला मदत करता येणे हा आहे. सहयोगी अध्ययनातून हीच सवय वर्गात रुजते.

कारण, जेव्हा विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात, तेव्हा केवळ ज्ञानाची देवाणघेवाण होत नाही, तर सहकार्य, विश्वास आणि परस्पर समजुतीची नातीही निर्माण होतात. हेच मूल्याधिष्ठित शिक्षणाचे खरे सामर्थ्य आहे!

मूळ लेख वाचा…

‘सहयोगी अध्ययन का मर्म और महत्त्व’ – श्री. दामोदर धुवारे, सहाय्यक शिक्षक, मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी स्कूल, गोंदिया.

नोव्हेंबर २०२६ | शिक्षण संक्रमण मासिक (PDF)

Share the Post:

Recent Blogs